विटा येथे विहिरीत बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:28 IST2021-03-27T04:28:13+5:302021-03-27T04:28:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विहिरीत मित्रांसमवेत पोहण्यास गेलेल्या विवेक भीमराव चौगुले (वय २१, रा. विवेकानंदनगर, विटा) या महाविद्यालयीन ...

College youth drowns in well at Vita | विटा येथे विहिरीत बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

विटा येथे विहिरीत बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : विहिरीत मित्रांसमवेत पोहण्यास गेलेल्या विवेक भीमराव चौगुले (वय २१, रा. विवेकानंदनगर, विटा) या महाविद्यालयीन तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास विटा ते कऱ्हाड रस्त्यावर असलेल्या संभाजी हराळे यांच्या विहिरीत घडली.

विटा येथील विवेक चौगुले हा बीसीएच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. तो दररोज विटा ते कऱ्हाड रस्त्यावर असलेल्या हराळे मळा येथील संभाजी हराळे यांच्या विहिरीत मित्रांसमवेत पोहण्यास जात होता. शुक्रवारी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे तो विहिरीत पोहण्यास गेला.

त्यानंतर तो अचानक पाण्यात बुडाला. हा प्रकार मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शोध घेतला असता तो पाण्यात बुडाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती अनिल हराळे यांनी विटा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून उत्तरीय तपासणीनंतर विवेकचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. विवेक याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

चौकट :

चोवीस तासांत दुसरी घटना...

विटा येथील हजारे मळा परिसरात असलेल्या विहिरीत पोहण्यास गेलेल्या चैतन्य सचिन वायदंडे या इयत्ता चौथीत शिकणाऱ्या ९ वर्षाच्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी विवेक चौगुले या २१ वर्षीय महाविद्यालयीन युवकाचा पोहण्यास गेल्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू झाला. विटा शहरात २४ तासांपूर्वीच दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: College youth drowns in well at Vita