सांगलीत वादळी वाऱ्याने जिल्ह्यात घरांची पडझड
By Admin | Updated: March 16, 2015 00:04 IST2015-03-15T23:30:32+5:302015-03-16T00:04:28+5:30
अवकाळी पाऊस : अंकलखोप परिसरात पपई, केळीच्या बागा जमीनदोस्त, शेतकरी चिंतेत

सांगलीत वादळी वाऱ्याने जिल्ह्यात घरांची पडझड
सांगली : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सुरू झालेल्या अवकाळी पावसाने रविवारी पहाटेपर्यंत मुक्काम केला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे घरांची पडझड होतानाच अंकलखोप परिसरातील पपई आणि केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. रविवारी सकाळी नुकसानीचे हे चित्र पाहून शेतकऱ्यांना धक्का बसला. शनिवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने मध्यरात्रीनंतर रविवारी पहाटेपर्यंत धुडगूस घातला. चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पलूस तालुक्यातील अंकलखोप व परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने दोन घरांची पडझड झाली. शेतातील घरांचे छत उडून गेले, तर ऊसतोडणी कामगारांच्या पालीही उडून गेल्या. शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग अजूनही कायम असून, शनिवारी मध्यरात्रीपासून तासगाव, जत, विटा, आटपाडी, वाळवा तालुक्यांमध्ये पावसाच्या किरकोळ सरी पडल्या. रविवारी दिवसभर प्रचंड उकाड्यासह ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे द्राक्षे, डाळिंब बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण कायम होते.
शनिवारी मध्यरात्री पुन्हा खानापूर, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व मुसळधार पाऊस झाला होता. खानापूर पूर्व भागात मुसळधार पावसासह गारपीट झाल्याने द्राक्षबागायतदारांना फटका बसला. मिरज तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
२४ तासांत १९ मि.मी. पाऊस
सांगलीमध्ये रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांमध्ये १९.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तासगाव : ४.८ मि. मी., कवठेमहांकाळ : १.६ मि. मी., जत : ०.४ मि. मी., खानापूर : ५ मि. मी., आटपाडी : २ मि. मी., पलूस : ५.५ मि. मी., वाळवा : ०.२ मि. मी.,
जिल्ह्यात एकूण : १९.५ मि. मी. (सरासरी : २ मि.मी.)