प्लास्टिकमुक्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:49 IST2021-03-13T04:49:15+5:302021-03-13T04:49:15+5:30
फोटो ओळ : वासोटा किल्ला भ्रमंती मार्गावर पर्यटकांनी अस्ताव्यस्त प्रकारे टाकलेले प्लास्टिक गोळा करून ते एकत्र करताना वनक्षेत्रपाल बाळकृष्ण ...

प्लास्टिकमुक्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी सहकार्य करा
फोटो ओळ : वासोटा किल्ला भ्रमंती मार्गावर पर्यटकांनी अस्ताव्यस्त प्रकारे टाकलेले प्लास्टिक गोळा करून ते एकत्र करताना वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस व त्यांचे सर्व सहकारी.
शिराळा : पर्यटकांनी ऐतिहासिक स्थळांना भेट देत असताना किंवा पर्यटन करत असताना प्लास्टिकचा वापर करू नये. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आम्हाला लवकरच प्लास्टिकमुक्त करावयाचा आहे. त्यामुळे पर्यटकांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन बामनोली वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांनी केले.
वासोटा, कोयना अभयारण्य आणि बामनोली परिसरात पर्यटकांनी घ्यावयाची काळजी, यासंदर्भात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, आम्हाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प लवकरच प्लास्टिकमुक्त करावयाचा आहे. त्यादृष्टीने आम्ही वासोटा, बामनोली, कोयना अभयारण्य, चांदोली, हेळवाक या परिसरातील पर्यटकांना आव्हान करतो की, आपण पर्यटनाला येत असताना आपल्यासोबत प्लास्टिकमध्ये असणारे पदार्थ किंवा प्लास्टिक संबंधित ज्या काही गोष्टी घेऊन येत असता त्या आपल्यासोबतच परत घेऊन जायच्या आहेत. तसेच योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी. जेणेकरून प्लास्टिक वापरासंबंधी मर्यादा येतील आणि त्याचबरोबर आपला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्लास्टिकमुक्त होईल. जैवविविधतेने आणि निसर्ग संपत्तीने हा परिसर बहरलेला आहे. त्याचे जतन करणे आणि त्याची वाढ करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या गोष्टींचे भान ठेवून आपण प्लास्टिकचा वापर टाळावा. जेणेकरून आपल्या पुढील पिढीला या सर्व गोष्टींचा आस्वाद घेता येईल.
यावेळी वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांच्यासह बामनोली परिक्षेत्रातील वन्यजीव विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.