तासगावमध्ये कोल्ड स्टोअरेजला आग

By Admin | Updated: January 2, 2015 00:11 IST2015-01-01T23:08:43+5:302015-01-02T00:11:36+5:30

कोट्यवधी रूपयांचे नुकसान : चार तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

Cold storage a fire in Tasgaon | तासगावमध्ये कोल्ड स्टोअरेजला आग

तासगावमध्ये कोल्ड स्टोअरेजला आग

कवठेएकंद : तासगाव शहरातील चिंचणी रोडवरील ऋतुराज कोल्ड स्टोअरेजला आज, गुरुवारी सकाळी ११.३0 वाजता अंतर्गत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. नगरपालिकांच्या पाच अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. चार तासांच्या अथक् प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. आगीमुळे तासगाव शहरात काळ्या धुराचे लोट पसरले होते.
तासगाव शहरातील चिंचणी रोडवर चंद्रसेन हिंदुराव पवार व त्यांचे बंधू यांच्या मालकीचे ऋतुराज कोल्ड स्टोअरेज आहे. सकाळी कोल्ड स्टोअरेजला अंतर्गत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अचानक लागलेल्या या आगीत स्टोअरेजमधील साहित्याने पेट घेतला. कामगारांच्या ही बाब लक्षात आली, त्यावेळी आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीत स्टोअरेजमधील बेदाणा माल, गंधक, वॉशिंग आॅईल, कागदी गठ्ठे, रिकामे बॉक्स, प्लॅस्टिक क्रेट, लाकडी बॅटन, गॅस, थर्माकोल व इतर स्टोअरेज इमारतीच्या साहित्याने पेट घेतला. स्टोअरेजच्या दरवाजातून व खिडक्यांतून धुराचे लोट बाहेर पडू लागले. धुराचे लोट संपूर्ण तासगाव शहरात पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
स्टोअरेजच्या अर्धा कि.मी. परिसरात धुरामुळे काहीच दिसत नव्हते. धुरामुळे बाजूचा के. के. नगर परिसर काळवंडला. आग विझविण्यासाठी प्रथम तासगाव नगरपालिकेच्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पालिका कर्मचाऱ्यांना नगरसेवक बाबासाहेब पाटील, शरद मानकर, अमोल शिंदे, जाफर मुजावर, माणिक जाधव, अरुण साळुंखे यांनी मदत केली. स्टोअरेजच्या आत जाण्यास कोणताच मार्ग नव्हता. त्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. स्टोअरेजच्या पाठीमागील बाजूची व पुढील बाजूची भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडली. स्टोअरेजच्या इमारतीच्या दोन्ही बाजूच्या भिंती पाडल्यानंतर बाहेरुन पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. (वार्ताहर)


अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल
तासगाव पालिकेच्या दोन, सांगली महापालिकेची एक, विटा नगरपालिकेची एक, आष्टा नगरपालिकेची एक अशा अग्निशमन दलाच्या पाच गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. पाचही अग्निशमन दलाच्या गाड्यांवरील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे साडेचार तासांनंतर आग आटोक्यात आली.
युवकांनी आतील बाजूचे प्लॅस्टिकचे क्रेट बाहेर काढल्याने थोडेफार नुकसान वाचले. पण आतील गंधक व इतर मालाने मात्र पेट घेतला. स्टोअरेजच्या आतील ज्वाला खिडकीतून बाहेर पडत होत्या.


घटनास्थळी खासदार संजय पाटील यांनी भेट दिली. त्यांनी पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत न आल्याने पाटील चांगलेच भडकले. त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आग विझविण्यासाठी तात्काळ प्रयत्न करण्याच्या सूचनाही दिल्या. पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांनी भेट दिली. नागरिकांची गर्दी पांगविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद नव्हती.

Web Title: Cold storage a fire in Tasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.