कडेगावात रंगल्या ताबूत भेटी
By Admin | Updated: October 25, 2015 00:42 IST2015-10-25T00:42:56+5:302015-10-25T00:42:56+5:30
भाविकांची गर्दी : हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश

कडेगावात रंगल्या ताबूत भेटी
कडेगाव : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा अनोखा सोहळा शनिवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात पार पडला. ‘प्यारा प्यारा हमारा देश न्यारा, अब एकीका कर दो पुकारा’ ‘हिंदू-मुस्लिम एक रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे’ या ऐक्याच्या संदेशाने परिसर दुमदुमून गेला.
मोहरमनिमित्त येथे गगनचुंबी ताबूतांच्या भेटी झाल्या. हा सोहळा पाहण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक आले होते. सकाळी नऊ वाजता शिवाजीनगर, निमसोड, सोहोली, कडेपूर आदी गावातील मानकऱ्यांना वाजत-गाजत ताबूताच्या ठिकाणी आणण्यात आले. त्यानंतर पूजा करून मानाचा सातभाई यांचा सर्वांत उंच ताबूत सकाळी सव्वाअकराला प्रथम उचलण्यात आला. त्यानंतर हा ताबूत वीज बोर्डाजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात साडेअकराच्यादरम्यान आणण्यात आले. त्यानंतर बागवान, आत्तार, शेटे यांचे ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. हे सर्व ताबूत ओळीने भेटीसाठी निघाले. त्यानंतर सातभाई पाटील, सातभाई बागवान, सातभाई आत्तार या उंच ताबूतांच्या भेटीचे प्रथम दर्शन दुपारी सव्वाबाराला झाले. हे सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेशबाबा पतसंस्थेजवळ आले. तेथे तांबोळी यांचा ताबूत मिळाला. दुपारी साडेबाराला सर्व ताबूत सुरेशबाबा देशमुख चौकात येऊन थांबले. तेथे इनामदार व सुतार यांचे उंच ताबूत आले. हिंदू मानकऱ्यांमार्फत मसूदमाला ताबूत व पंजे, बारा इमामचे पंजे, नालसाहेब यांचे पंजे आणले गेले.
दुपारी दीडला ताबूत उचलण्यात आले व मुख्य भेटीचा सोहळा सुरू झाला. प्रारंभी सातभाई पटेल, सातभाई इनामदार, सातभाई आत्तार आदी उंच ताबूतांच्या भेटीला सुरुवात झाली. यावेळी गृहराज्यमंत्री राम शिंदे, माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम, कऱ्हाडचे आ. बाळासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम, डॉ. जितेश कदम, रविराज देशमुख, भाऊसाहेब यादव, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार हेमंत निकम, सरपंच राजू जाधव, जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी आदी उपस्थित होते. मोहरमनिमित्त रविवारी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे. जियारत कार्यक्रम सोमवारी सकाळी १० वाजता होणार आहे. (वार्ताहर)