जिल्ह्यात सोमवारपासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:25 IST2021-02-12T04:25:25+5:302021-02-12T04:25:25+5:30
सांगली : अनेक अडथळ्यांच्या शर्यतीनंतर अखेर सांगलीतील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना आता सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील १७४ निवडणुकांचा धडाका ...

जिल्ह्यात सोमवारपासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धडाका
सांगली : अनेक अडथळ्यांच्या शर्यतीनंतर अखेर सांगलीतील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना आता सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील १७४ निवडणुकांचा धडाका सोमवारी १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक प्राधिकरणाने विभागीय
सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. यात जिल्हा बॅंक, जिल्हा औद्योगिक संस्थेसह चार संस्था ‘अ’ वर्गातील, ‘ब’ वर्गातील ७७, ‘क’ वर्गातील ५८, तर ‘ड’ वर्गातील ४३ संस्था आहेत.
गेल्या वर्षभरापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक मिळत होता. अखेर या अडचणी दूर झाल्याने शासनाने त्यांना हिरवा कंदील दर्शविला आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी १५ ते २२
फेब्रुवारीपर्यंत सभासद संस्थांनी मतदान प्रतिनिधींचे ठराव तालुका उपनिबंधकांकडे जमा करावेत, असे आदेश कोल्हापूर विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक सहा टप्प्यात घेण्याचा जिल्हा निवडणूक आराखडा पुन्हा एकदा प्राधिकरणास सादर केला होता. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र निवडणूक प्राधिकरणाने निर्णय घेण्यास विलंब लावला. अखेर बुधवारी याबाबतचे आदेश देण्यात आले. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून सुधारित निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यात डिसेेंबरअखेर एकूण १ हजार ५२८ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंक, पलूस व जत अर्बन बॅंक तसेच विकास सोसायट्या, दूध संस्था, खरेदी-विक्री संस्था व अन्य सहकारी
संस्थांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १७४ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सोमवारपासून सुरू
होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक विभागीय सह निबंधकांच्या आखत्यारित आहे, तर ‘ब’ वर्गातील संस्थांची निवडणूक जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून होणार आहे. ‘क’ व ‘ड’ वर्गातील संस्थांची निवडणूक प्रक्रिया तालुका उपनिबंधकांच्या आखत्यारित होणार आहे.
चौकट
एप्रिलमध्ये जिल्हा बँक निवडणुकीचा धुरळा
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. एप्रिलअखेर मतदानाची चिन्हे आहेत.
विभागीय सहनिबंधकांनी सभासद संस्थांना ठराव देण्याचे अवाहन केले आहे. १५ ते २२
फेब्रुवारीअखेर तालुका निबंधकांकडे हे ठराव जमा करायचे आहेत.