सहकार क्षेत्राची राज्यभर वाताहत
By Admin | Updated: September 6, 2015 23:15 IST2015-09-06T23:15:10+5:302015-09-06T23:15:10+5:30
आनंदराव आडसूळ : सहकारी बँक कर्मचारी मेळाव्यात टीका

सहकार क्षेत्राची राज्यभर वाताहत
सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र हे राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्याच ताब्यात आहे. परंतु त्या सहकार क्षेत्राची सध्या वाताहत सुरू आहे, अशी टीका बॅँक एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष आणि खासदार आनंदराव आडसूळ यांनी केली.
येथील मराठा समाज कार्यालयात रविवारी सहकारी बॅँकेतील कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. व्यासपीठावर सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे माजी अध्यक्ष डी. के. पाटील उपस्थित होते. खा. आडसूळ म्हणाले, विविध बॅँकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असून, कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या घामाला दाम तसेच सन्मान मिळालाच पाहिजे. परंतु तसे होत नसेल तर प्रसंगी न्यायासाठी बाह्या वर सरकल्या तरी हरकत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांनी नेहमी बॅँकेतील सभासदांचे प्रतिनिधी म्हणून कार्यशील राहिले पाहिंजे. कर्मचारी हा बॅँकेची प्रामाणिकपणे सेवा करतो. साहजीकच त्यांच्या हक्काचे दाम त्याला मिळणे क्रमप्राप्त आहे. परंतु कित्येक ठिकाणी ते होताना दिसत नाही. त्यामुळेच संघटनांची आवश्यकता आहे. सहकार चळवळीतून सामान्यांचा उत्कर्ष व्हायला पाहिजे, ही संकल्पना आपल्या मनात पक्की बसली पाहिजे व त्यानुसारच संचालक मंडळांचा व्यवहार असणे अपेक्षित आहे.
आपली जिल्हा बॅँक नियमानुसार चालली नसल्यामुळेच त्यावर प्रशासक नेमण्यात आला होता. परंतु प्रशासक असतानाही बॅँकेचे कामकाज कर्मचाऱ्यांनीच भक्कमपणे सांभाळले होते. ज्यांच्यामुळे बॅँक अवसायक बनली, त्यांनाच पुन्हा सभासदांनी निवडून दिले आहे. हीच परिस्थिती राज्यातही इतरत्र दिसते. ती दुर्दैवी असल्याचेही आडसूळ यांनी सांगितले.
डी. के. पाटील म्हणाले की, बॅँक कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी वारंवार आपण आवाज उठविला आहे. आपल्या न्याय्य हक्कासाठी कर्मचाऱ्यांनी नेहमी संघर्ष केला पाहिजे, परंतु त्याचवेळी संचालकांचादेखील आदर केला पाहिजे. कर्मचाऱ्यांनी कधीही स्वाभिमानाला तिलांजली देऊ नये.
यावेळी कार्यक्रमास संघटनेचे कार्याध्यक्ष नरेंद्र सावंत, सरचिटणीस प्रदीप पाटील, चंद्रशेखर गवळी, पदाधिकारी, सहकारी संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
देण्या-घेण्याला महत्त्व!
पूर्वी बॅँकेत नोकरी हवी असेल तर ‘नाती-गोती’ उपयोगाला येत होती. सध्या मात्र देण्या-घेण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. ही वस्तुस्थिती कोणीच नाकारु शकत नाही. मुळात नोकरी हवी असेल तर पैसे कशाला लागतात, हे अनाकलनीय कोडे आहे, असे मत खा. आडसूळ यांनी यावेळी व्यक्त केले.