सांगली : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात वाहनांसाठी सीएनजी उपलब्ध झाला आहे. भारत गॅस रिसोर्सेस कंपनीद्वारे सांगली व आष्टा येथे सीएनजीचे वितरण सुरू झाले आहे. मात्र मागणीइतका पुरवठा नसल्याने वाहनांच्या रांगा लागत आहेत.
भारत गॅस कंपनीतर्फे पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याची तयारी सुरू आहे. काम पूर्ण होण्यास आणखी किमान वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्त पंपांवर टँकरद्वारे गॅस उपलब्ध करण्यात आला आहे. आष्ट्यामध्ये जून महिन्यात, तर सांगलीत १ ऑगस्टपासून पुरवठा झाला. प्रतिकिलो दर ७०.८५ रुपये आहे. एक किंवा दोन लिटरप्रमाणे भरून घेता येत नाही. एकदा गॅसचे नोझल सुरू केले की टाकी फुल्ल करून घ्यावी लागते. पेट्रोलच्या किमती १०८ रुपयांवर गेल्याने सीएनजीची मागणी प्रचंड वाढली आहे; पण मागणीइतका गॅस मिळत नसल्याची स्थिती आहे. दोन दिवसांत एखादा टँकर सांगलीत येतो. अवघ्या तीन-चार तासांत संपतोदेखील.
रत्नागिरीमधील गॅस प्रकल्पातून सांगलीला टँकरने पुरवठा होतो. छोटी प्रवासी कार एक किलो गॅसमध्ये सुमारे २६ किलोमीटर धावते. म्हणजे एक किलोमीटरसाठी फक्त पावणेतीन रुपये खर्च येतो. पुण्यात सुमारे ५६ रुपये दर आहे. वाहतुकीच्या खर्चामुळे सांगलीत भाव जास्त असल्याचे वितरकांनी सांगितले. सांगलीत कर्नाळ रस्ता, कॉलेज कॉर्नर, कुपवाड रस्ता आणि मिरजेत वखारभागात आणखी गॅस पंप लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. भविष्यात पुरवठा वाढल्यानंतर दर कमी होऊ शकतील.
चौकट
सीएनजीचे प्रतिकिलो भाव
सांगली ७०.८५ रुपये
पुणे ५६ रुपये
चौकट
गॅसवरील वाहनांचे पासिंग सुरू
सीएनजीची उपलब्धता होताच त्यावर चालणाऱ्या वाहनांचे पासिंग आरटीओ प्रशासनाने सुरू केले आहे. यामध्ये प्रवासी व मालवाहू वाहनांचा समावेश आहे. सीएनजी उपलब्ध झाल्याने त्यावर चालणारी वाहनेही वितरकांनी उपलब्ध करायला सुरुवात केली आहे.
कोट
सीएनजीला मागणी प्रचंड आहे. वाहनांच्या रांगा लागत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांचा कल तुलनेने स्वस्तातील सीएनजीकडे आहे.
- अमोल इंगवले, वितरक