मुख्यमंत्र्यांचा पक्ष जिल्हा कार्यालयाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:25 IST2021-08-29T04:25:59+5:302021-08-29T04:25:59+5:30
सांगली : जिल्ह्यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला अखेर कित्येक वर्षांनंतर जिल्हा कार्यालय मिळाले, मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे ...

मुख्यमंत्र्यांचा पक्ष जिल्हा कार्यालयाविना
सांगली : जिल्ह्यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला अखेर कित्येक वर्षांनंतर जिल्हा कार्यालय मिळाले, मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे जिल्ह्याच्या ठिकाणी अद्याप कार्यालय झालेले नाही. पदाधिकारी, शिवसैनिकांना एकत्रित येण्यासाठी विश्रामगृह किंवा मंगल कार्यालयांचा आधार घ्यावा लागत आहे.
पक्षाच्या जिल्हा कार्यालयामुळे पक्षीय नियोजनाला हातभार लागत असतो. निवडणुकांमध्ये कार्यालयांची निकड अधिक भासते. तरीही गटातटांच्या राजकारणात जिल्ह्यात विविध पक्षांची कार्यालये नेहमीच चर्चेत राहिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्थापनेपासून कार्यालये मिळाली आहेत, तरीही गटबाजीमुळे तेथील राजकारणही सतत चर्चेत असते. जिल्हा कार्यालये असतानाही अनेक नेत्यांची स्वतंत्र कार्यालयेसुद्धा आहेत. त्यामुळे गटांच्या वेगळ्या चुलीही दिसत आहेत.
शिवसेनेला मात्र इतक्या वर्षात सांगली जिल्ह्याचे कार्यालय उभारता आलेले नाही. पक्षाचे जिल्ह्यातील बळ वाढत आहे. पक्षाचा एक आमदार आहे. नगरसेवक आहेत. शिवाय पंचायत समिती, ग्रामपंचायतीत सत्ता मिळविल्यानंतरही शिवसैनिक कार्यालयापासून वंचित आहेत. भाजपलाही स्टेशन रस्त्यावरील जिल्हा कार्यालय बंद झाल्यानंतर जवळपास एक तप कार्यालयासाठी प्रतीक्षा करावी लागली. दरम्यानच्या काळात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयाचा उपयोग भाजपला झाला. आता भाजपने जिल्हा कार्यालयाची उभारणी केली आहे. मात्र मोठ्या चार पक्षांमध्ये शिवसेनेलाच जिल्हा कार्यालयाविना रहावे लागले आहे.
चाैकट
सेंटर पॉईंटची लढाई
पक्षांची जिल्हा कार्यालये असतानाही प्रत्येक पक्षातील नेत्यांनी स्वतंत्र कार्यालये उभारली आहेत. काहींची निवासस्थानेही पक्षीय राजकारणाचा केंद्रबिंदू होऊ पाहात आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना, मंत्र्यांना जिल्हा कार्यालयापेक्षा नेत्यांच्या निवासस्थानी, संपर्क कार्यालयांमध्ये बोलावण्यात येते. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप या पक्षांमध्ये सेंटर पॉईंटची ही लढाई अधिक आहे.
चौकट
शिवसेनेची तर सर्वबाजूंनी अडचण
शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी संपर्क कार्यालये काढली असली, तरी ती आकाराने लहान आहेत. एखादी बैठकसुद्धा तिथे होऊ शकत नाही. पदाधिकारी, नेत्यांची निवासस्थाने छाेटी आहेत. त्यामुळे नेत्यांना विश्रामगृह किंवा मंगल कार्यालयांमध्ये बैठका घ्यावा लागतात.