वाहन नोंदणीची ‘स्मार्ट कार्ड’ योजना बंद

By Admin | Updated: December 2, 2014 00:16 IST2014-12-01T23:40:26+5:302014-12-02T00:16:29+5:30

अंमलबजावणी सुरू : पक्क्या लायसन्ससाठीही आता बुकिंग; १ डिसेंबरपासून झाली अंमलबजावणी

Closing the vehicle registration 'smart card' scheme | वाहन नोंदणीची ‘स्मार्ट कार्ड’ योजना बंद

वाहन नोंदणीची ‘स्मार्ट कार्ड’ योजना बंद

सांगली : नवीन वाहन असो अथवा जुने, ते नावावर करुन घेतल्यानंतर देण्यात येणारे ‘स्मार्ट कार्ड’ योजना (आरसी बुक) आज, सोमवारपासून बंद करण्यात आली आहे. याबदल्यात आता ग्राहकांना कागदी स्वरुपात प्रमाणपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) शेखर कुलकर्णी यांनी दिली. तसेच वाहन चालविण्याच्या पक्क्या लायसन्ससाठीही ग्राहकांना आता आॅनलाईन बुकिंग करावे लागणार आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
कुलकर्णी म्हणाले की, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रशासकीय कामात सातत्याने बदल होत आहे. पूर्वी वाहन घेतल्यानंतर ते स्वत:च्या नावावर झाल्याची नोंद करुन घेतल्यानंतर पुस्तक मिळायचे. लायसन्स काढल्यानंतरही पुस्तक मिळत होते. मात्र गेल्या आठ वर्षापासून ही जुनी पद्धत बंद करण्यात आली. त्याबदल्यात आता स्मार्ट कार्ड ही नवीन योजना सुरु करण्यात आली. या योजनेमुळे वाहनधारकांचा सर्व डाटा संगणकावर एकत्रित करण्यात आला. जुनी रजिस्टर कालबाह्य करण्यात आली. नवीन वाहन खरेदी करतानाच कंपनीकडून स्मार्ट कार्डचे पैसे भरुन घेतले जायचे. कंपनीकडूनच वाहन पासिंग करुन दिले जात असल्याने, स्मार्ट कार्डही त्यांच्याकडूनच पोस्टाने घरपोच व्हायचे.
केंद्र शासनाकडून मोटार वाहन कायद्यात बदल होण्याचे संकेत आहेत. येत्या काही महिन्यात हे बदल होतील. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने वाहन नावावर करुन दिल्यानंतर देण्यात येणारी स्मार्ट कार्ड योजना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्या बदल्यात वाहनधारकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी एक पैसाही घेतला जाणार नाही. कोल्हापुरात ही नवीन योजना सुरु झाली आहे. तेथील प्रमाणपत्राचा नमुना आणण्यात आला आहे. त्यानुसार येथेही तशीच योजना सुरु केली आहे. ज्या ग्राहकांची स्मार्ट कार्ड आहेत, त्यांचा या नव्या योजनेत समावेश केला जाणार नाही. १ डिसेंबरनंतर वाहन खरेदी करणाऱ्या वाहनधारकांनाच ही योजना लागू करण्यात आली आहे.
वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मग ते कच्चे असो अथवा पक्के, ते काढण्यासाठी कधीही गेले तरी चालत होते. मात्र सहा महिन्यांपूर्वी कच्चे लायसन्स काढण्यासाठी वाहनधारकांना आॅनलाईन बुकिंग सुरु करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता पक्के लायसन्स काढण्यासाठीही आॅनलाईन बुकिंग सक्तीचे करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणीही आजपासून सुरु करण्यात आली असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)



कोल्हापुरात सुरू
कोल्हापुरात ही नवीन योजना सुरु झाली आहे. तेथील प्रमाणपत्राचा नमुना आणण्यात आला आहे. त्यानुसार येथेही तशीच योजना सुरु केली आहे. ज्या ग्राहकांची स्मार्ट कार्ड आहेत, त्यांचा या नव्या योजनेत समावेश केला जाणार नाही.
कोल्हापूरच्या धर्तीवर सांगलीत ही योजना सुरू होत आहे.

वाहनधारकांची ३५० रुपयांची बचत
कुलकर्णी म्हणाले, वाहन नावावर झाल्याचे स्मार्ट कार्ड देण्यासाठी वाहनधारकांकडून साडेतीनशे रुपये फी घेतली जायची. मात्र नव्या योजनेत एक पैसाही घेतला जाणार नाही. वाहनधारकांना वाहन नावावर झाल्याचे देण्यात येणारे प्रमाणपत्र मोफत दिले जाणार आहे. यामुळे वाहनधारकांची ३५० रुपयांची बचत होणार आहे. गेल्या दोन दिवसात ज्यांचे ३५० रुपये जमा करुन घेण्यात आले आहेत, त्यांना हे पैसे परत केले जाणार आहेत.

Web Title: Closing the vehicle registration 'smart card' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.