मारहाणीच्या निषेधार्थ ‘लेखणी बंद’
By Admin | Updated: April 22, 2015 00:24 IST2015-04-21T23:22:38+5:302015-04-22T00:24:03+5:30
महापालिका कर्मचारी आक्रमक : दोन दिवसात काँग्रेसची बैठक

मारहाणीच्या निषेधार्थ ‘लेखणी बंद’
सांगली : महापालिकेच्या सभेत नगरसचिव चंद्रकांत आडके यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करीत निदर्शने केली. नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे; पण आयुक्त गैरहजर असल्याने त्यावर निर्णय होऊ शकलेला नाही. दरम्यान, नगरसेवकांनी काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यावर दोन दिवसांत बैठक घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी झालेल्या सभेत इतिवृत्त व ऐनवेळी घुसडण्यात आलेल्या ठरावावरून प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळानंतर महापौरांनी सभा गुंडाळली. सभेनंतर सभागृहातून बाहेर पडताना नगरसचिव आडके यांना नगरसेवकांनी अडविले. यावेळी त्यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी पालिकेत उमटले. सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे दिवसभर पालिकेचे कामकाज ठप्प झाले होते. कर्मचाऱ्यांच्यावतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. यात नगरसेवकांवर फौजदारी दाखल करावी, त्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. आयुक्तांनी गुन्हा दाखल करावा, अथवा प्रशासन अधिकाऱ्याला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळी महापालिका कामगार सभेच्यावतीने प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. पालिका कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिला जात असून, ही बाब गंभीर आहे. गेल्या पंधरा दिवसांत पाणीपुरवठा अभियंत्यांनासुद्धा दमदाटी करण्यात आली. संबंधित लोकप्रतिनिधींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी माजी मंत्री मदन पाटील यांची भेट घेऊन महापौरांविरोधात तक्रारी केल्या, तर महापौरांनीही पाटील यांची भेट घेऊन बाजू मांडली. याबाबत बैठक बोलाविली जाणार आहे. (प्रतिनिधी)
महापौरांची बैठक
महापौर विवेक कांबळे यांनी गुरुवारी दुपारी नगरसेवकांची बैठक बोलाविली आहे. तसे नगरसेवकांना लेखी पत्राद्वारे कळविले जाणार आहे. या बैठकीत दूध का दूध, पानी का पानी करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. नगरसेवकांच्या तक्रारी ऐकून घेऊन आपली बाजूही ते काँग्रेस नगरसेवकांसमोर मांडणार आहेत.