पाणी मागणीअभावी म्हैसाळ योजना बंद
By Admin | Updated: December 1, 2014 00:07 IST2014-11-30T22:31:57+5:302014-12-01T00:07:37+5:30
पिके अडचणीत : नियोजन कोलमडले

पाणी मागणीअभावी म्हैसाळ योजना बंद
मिरज : म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनासाठी शेतकऱ्यांनी मागणी नोंदविली नसल्याने म्हैसाळचा पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. फेब्रुवारीअखेर रब्बी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र मागणी नसल्याने पाणी बंद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून मागणी नोंदविल्यास यापुढे म्हैसाळचे पाणी सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
म्हैसाळच्या रब्बी आवर्तनासाठी पंप सुरू करण्यात आले होते. मात्र १ कोटी ६२ लाख वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला. पाटबंधारे विभागाने टंचाई निधीतून वीज बिल भरण्याची हमी दिल्यानंतर म्हैसाळचे पंप दि. ७ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू झाले. म्हैसाळचे हजारो हेक्टर लाभक्षेत्र असताना, एकाही शेतकऱ्याने पाण्याची मागणी नोंदविली नसल्याने पाणी उपसा करणाऱ्या पंपाची व जतपर्यंतच्या कालव्याची चाचणी घेण्यात आली. फेब्रुवारीत खरड छाटणीला पाण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्याने मागणीअभावी रब्बी आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी म्हैसाळचे पाणी बंद करण्यात आले असून, पुढील हंगामात शेतकऱ्यांनी पाणी बिलाची रक्कम भरून मागणी नोंदविल्यास पाणी सुरू करण्यात येणार असल्याचे म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मिरज व तासगाव तालुक्यात पावसाचे पाणी अद्याप ओढे-नाल्यात आहे. जत व कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या पावसामुळे अद्याप येथील शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)