मिरजेतील अवैध कत्तलखाने बंद करा
By Admin | Updated: November 16, 2014 23:48 IST2014-11-16T22:47:49+5:302014-11-16T23:48:38+5:30
आयुक्तांना साकडे : साथीचे आजार रोखण्याचे आवाहन

मिरजेतील अवैध कत्तलखाने बंद करा
मिरज : मिरजेत डेंग्यू व गॅस्ट्रो या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी शहरातील मोमीन गल्ली व परिसरातील जनावरांचे अवैध कत्तलखाने बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे. शहरात सुरू असलेल्या मोठ्या जनावरांच्या अवैध कत्तलीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मिरज शहरात मध्यवर्ती भागात लक्ष्मी मार्केट परिसरात मोमीन गल्ली, अत्तार गल्ली, बागवान गल्ली या भागात मोठ्या जनावरांचे बेकायदा कत्तलखाने सुरू आहेत. महापालिका कार्यालयापासून केवळ दोनशे मीटर अंतरावर लोकवस्तीत पंचवीसपेक्षा जास्त कत्तलखाने पहाटे पाच वाजल्यापासून सुरू असतात. घरात सुरू असणाऱ्या कत्तलखान्यास ट्रक, टेम्पोतून मोठ्या जनावरांचा पुरवठा केला जातो. उघड्यावर जनावरांच्या कत्तली सुरू असताना महापालिका आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. कत्तल करून टाकाऊ अवयव उघड्यावर टाकण्यात येत असल्याने या परिसरात दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान बालके व वृध्दांना साथीच्या आजाराची लागण होऊन भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे.
शहरातील अवैध कत्तलखाने तातडीने बंद करावेत, अशी मागणी करीम धत्तुरे, आयुब मोमीन, सत्तार शेख, झाकीर मोमीन, सुरेश तंबाखूवाले यांच्यासह नागरिकांनी सह्यांच्या निवेदनाव्दारे केली आहे. (वार्ताहर)
कर्नाटकातील जनावरे
महापालिकेने मोठ्या जनावरांसाठी लाखो रुपये खर्च करून शहराबाहेर बेडग रस्त्यावर अद्ययावत कत्तलखाना बांधला आहे. मात्र महापालिकेच्या कत्तलखान्यात स्थानिक मांस विक्रेते जात नसल्याने महापालिकेच्या कत्तलखान्यात कर्नाटकातील जनावरांची कत्तल करून मांसाची निर्यात करण्याचा व्यवसाय सुरू आहे.