लिपिकानेच दिले बोगस जन्मदाखले!

By Admin | Updated: April 21, 2015 00:32 IST2015-04-21T00:26:37+5:302015-04-21T00:32:13+5:30

वायफळे ग्रामपंचायत : घोटाळ्यांची मालिका सुरूच

Clerk gave bogus birth certificate! | लिपिकानेच दिले बोगस जन्मदाखले!

लिपिकानेच दिले बोगस जन्मदाखले!

सावळज : वायफळे ग्रामपंचायतीमध्ये बोगस पावत्या व शिक्के तयार करून लिपिकांनी लाखो रुपयांवर डल्ला मारला असतानाच, अजून एक नवीन घोटाळा उजेडात आला आहे. लिपिक सूरज सावंत याने अनेकांना जन्माचे दाखलेही बोगस दिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये अजून किती घोटाळे बाहेर येणार?, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
यापूर्वी बोगस पावत्यांद्वारे घरपट्टी, पाणीपट्टी व दुकानगाळ्यांच्या पैशात अपहार केल्याप्रकरणी सूरज सावंत, प्रशांत सावंत व मेहबूब मुलाणी यांना अटक करण्यात आली होती. या अपहाराचा आकडा ११ लाखाच्या घरात गेला असून, तो दिवसेंदिवस वाढत आहे. सूरज सावंत याने ग्रामपंचायतीच्या रजिस्टरला नोंद नसताना जन्माचे बोगस दाखले दिले आहेत. यावर ग्रामपंचायतीचा शिक्का व सावंत याची सही आहे.
आठ वर्षांत ग्रामपंचायतीमध्ये एवढे मोठे घोटाळे होऊनही त्या कालावधित ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या जराही लक्षात आले नाही, हे आश्चर्य आहे.
वायफळे हे गाव राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील मानले जाते. येथे प्रत्येक गोष्टीचे राजकारण केले जाते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेचा वाद सुप्रिम कोर्टापर्यंत गेला होता. येथील आर. आर. पाटील समर्थक साहेबराव पाटील व खा. संजयकाका पाटील समर्थक सुखदेव पाटील यांचे राजकीय हाडवैर जिल्ह्याला परिचित आहे. मात्र ग्रामपंचायतीमध्ये झालेला घोटाळा हा दोघांच्याही कालावधित झाल्यामुळे एरवी किरकोळ गोष्टीसाठी आकाश-पाताळ एक करणारे नेते गप्प आहेत. दोघांनीही आतापर्यंत विकास कमी व राजकारणच जास्त केले आहे.
येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. सत्ताधारी ग्रामपंचायत गटाचे नेते सुखदेव पाटील यांनी विरोधकांवर या घोटाळ्याचा आरोप करीत, माझ्याकडे अनेक पुरावे असून, ते लवकरच सादर केले जातील, अशी भीमगर्जना
केली होती. मात्र अजून त्यांना त्यासाठी मुहूर्त मिळाला नाही काय?, असा सवालही ग्रामस्थांतून होत आहे. (वार्ताहर)


‘ते’ दोन्ही नेते गप्प का ?
वायफळे हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव. येथील आर. आर. पाटील समर्थक साहेबराव पाटील व खा. संजय पाटील समर्थक सुखदेव पाटील यांच्यातून राजकीयदृष्ट्या विस्तवही जात नाही. मात्र या ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत ११ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तिघांना अटकही झाली आहे. किरकोळ गोष्टीवरून एकमेकांवर आगपाखड तसेच कुरघोडीचे राजकारण करणाऱ्या या नेत्यांनी गावातील गैरव्यवहारप्रकरणी मिठाची गुळणी का धरली आहे?, असा सवाल ग्रामस्थांतून होत आहे.

Web Title: Clerk gave bogus birth certificate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.