सोनहिरा ओढ्याची स्वच्छता गतीने सुरु
By Admin | Updated: December 1, 2014 00:04 IST2014-11-30T22:40:55+5:302014-12-01T00:04:42+5:30
पन्नास लाखांचा निधी : चिंंचणी हद्दीमध्ये कामास प्रारंभ

सोनहिरा ओढ्याची स्वच्छता गतीने सुरु
कडेगाव : माजी पालकमंत्री पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने सोनहिरा ओढ्याच्या स्वच्छतेसाठी एक नावीन्यपूर्ण योजना मंजूर झाली. या योजनेसाठी ५० लाख रुपयांचा निधीही जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजूर झाला. याचे काम जलसंपदा विभाग, कोल्हापूरच्या यांत्रिकी विभागाने जानेवारीमध्ये सुरू केले. सोनसळपासून रामापूर २२ कि. मी. अंतरावर सोनहिरा ओढा स्वच्छतेचे काम जानेवारीमध्ये सुरू झाले. सोनसळ, शिरसगाव, सोनहिरा हद्दीतील स्वच्छता पूर्ण झाली. आता चिंचणी हद्दीत काम सुरू आहे. यामुळे परिसरातील नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.
सोनहिरा ओढ्यात गारवेल तसेच काटेरी झाडाझुडपांचे साम्राज्य आहे. यामुळे शेतकरी व परिसरातील नागरिक हैराण झाले ओत. यावर उपाययोजना करण्याचा संकल्प मोहनराव कदम यांनी केला आणि लोकसहभागातून सोनहिरा स्वच्छता मोहीम सुरू केली. परंतु केवळ नागरिकांच्या परिश्रमातून हे काम पूर्ण होणार नाही, हे पतंगराव कदम यांनी जाणले आणि या कामाला नावीन्यपूर्ण योजना असे नाव देऊन ५० लाख रुपयांचा निधी दिला.
आता सोनसळ, शिरसगाव, सोनकिरे हद्दीतील सोनहिरा ओढ्याचे पात्र जलसंपदा विभाग कोल्हापूरच्या यांत्रिकी विभागाच्या पोकलॅन मशीनच्या सहाय्याने स्वच्छ केले आहे. आता हे काम चिंचणी हद्दीत सुरू झाले आहे. गारवेल व काटेरी झाडाझुडपात गुदमरलेला ओढा येथे मोकळा श्वास घेत आहे. चिंचणीपासून आसद, मोहित्यांचे वडगाव, देवराष्ट्रे, शिरगावपासून रामापूर हद्दीत सोनहिरा येरळा संगमापर्यंत हे सोनहिरा ओढ्याच्या स्वच्छतेचे काम होणार आहे.
यांत्रिक विभाग कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता जे. व्ही. खाडे, जलसंपदा विभागाचे उपअभियंता यु. ए. गावडे, शाखा अभियंता बी. डी. कांबळे आदी अधिकारी आणि कर्मचारी आठ महिन्यांपासून येथे प्रयत्नशील आहेत.
ताकारी योजनेचे पाणीही या सोनहिरा ओढ्यातून वाहते. योजनेचे आवर्तन सुरू झाल्यावर या कामात अडथळे निर्माण होतात. पावसाळ्यातही ओढ्यात जास्त पाणी असल्याने काम बंद होते. आता मात्र मे २०१५ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास संबंधित अधिकारी व्यक्त करीत आहेत.
पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष सुबराव महाडिक, चिंचणीचे सरपंच अशोक महाडिक व सर्व सदस्य मोहिमेसाठी सहकार्य करीत आहेत. (वार्ताहर)
पन्नास टक्केच खर्च
सोनहिरा ओढ्यामध्ये ताकारी योजनेचेही पाणी सोडले जाते. हे काम सार्वजनिक हिताचे व पाटबंधारे विभागाशी संबंधित असल्याने केवळ ५० टक्के दराने यांत्रिकी विभागाने हे काम हाती घेतले होते. अंदाजपत्रकातही ५० टक्के दर असल्याने ५० लाखांच्या निधीमध्ये हे संपूर्ण काम होणार आहे. येथे अप्रतिम व दर्जेदार काम करून स्वच्छ व सुंदर सोनहिरा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे कार्यकारी अभियंता जे. व्ही. खाडे यांनी सांगितले.