लोकवर्गणीतून सार्वजनिक विहिरीची स्वच्छता
By Admin | Updated: September 3, 2015 23:49 IST2015-09-03T23:49:48+5:302015-09-03T23:49:48+5:30
दुंडगे येथील तरुणांचा पुढाकार : लाखाचा खर्च अपेक्षित; निधीची मागणी

लोकवर्गणीतून सार्वजनिक विहिरीची स्वच्छता
गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामदैवत मारुती मंदिरासमोरील सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्याचे काम लोकवर्गणी व लोकसहभागातून सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत गावातील तरुण कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. या कामासाठी दीड लाखांचा खर्च अपेक्षित आहे.यावर्षी पावसाने ओढ दिल्याने गावात पाणीटंचाईची शक्यता गृहीत धरून तरुण कार्यकर्त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. याकामी गावकऱ्यांनी सढळ हस्ते मदतीचा हात दिला आहे. गाळ काढण्यासाठी अंदाजे ५० हजार आणि संरक्षक जाळीसळ विहीर दुरुस्तीसाठी सुमारे एक लाखाचा खर्च अपेक्षित आहे.या मोहिमेत संतोष देसाई, मंजुनाथ मदकरी, विजय संकपाळ, नाईक, सुजित संकपाळ, राजेंद्र सुतार, राजेंद्र जडे, सोमनाथ पाटील, अमित पाटील, अक्षय पाटील, संजय केंगार, आप्पासाहेब सावंत, मारुती दंडगीदास, सुनील खवरे, राजेंद्र पाटील, मारुती पायमल्ली, भैरू नाईक, दुंडाप्पा पाटील, आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मंडल अधिकारी विकास जाधव, तलाठी राजश्री पचंडी, सरपंच रूपाली दावणे, उपसरपंच डॉ. काशिनाथ संकेश्वरी यांनी विहिरीस भेट देऊन सार्वजनिक कामातील सहभागाबद्दल या तरुणांचे विशेष कौतुक केले. (प्रतिनिधी)
१०० वर्षांपूर्वीची विहीर---१९१२ मध्ये गांधीवादी कार्यकर्ते
मा. ना. कुलकर्णी यांनी ही विहीर स्व:खर्चाने बांधली आणि गावकऱ्यांसाठी खुली केली. त्याकाळी निम्मे गाव याच विहिरीवर अवलंबून होते. गावात नळ योजना झाल्यानंतर या विहिरीकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आठ ते दहा फुटांचा गाळ विहिरीत साचला आहे. गाळ काढण्यासह विहिरीच्या दुरुस्तीसाठी टंचाई योजनेतून भरीव निधी मिळावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.