आष्ट्यात ‘शिवनेरी’कडून स्मशानभूमीची स्वच्छता

By Admin | Updated: February 21, 2015 00:16 IST2015-02-20T23:43:55+5:302015-02-21T00:16:20+5:30

अनोखा उपक्रम : शोभेच्या झाडांमुळे परिसर फुलला; परिसरातून कौतुक

Cleanliness of crematorium from Shivneri | आष्ट्यात ‘शिवनेरी’कडून स्मशानभूमीची स्वच्छता

आष्ट्यात ‘शिवनेरी’कडून स्मशानभूमीची स्वच्छता

सुरेंद्र शिराळकर - आष्टा  येथील शिवनेरी सेवाभावी संस्थेच्यावतीने शहरातील कदम वेसनजीकच्या अमरधाम स्मशानभूमीची नियमित स्वच्छता करण्यात येत आहे. तेथे विविध प्रकारची शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. तानाजी सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनोखा उपक्रम राबवित समाजसेवेचे व्रत जोपासले आहे.येथील कदम वेसनजीक पालिकेने अमरधाम हिंदू स्मशानभूमी उभारली आहे. शहरानजीकच स्मशानभूमी आहे. काही वर्षांपूर्वी याठिकाणी फक्त दोन दाहिनी शेड होती. आता नागरिकांना बसण्यासाठी दोन कठडे बांधण्यात आले आहेत. एक कूपनलिकाही आहे. मात्र परिसरात पाणी साचल्याने दुर्गंधीचे साम्राज्य होते. गवतही वाढले होते. कुत्री व डुकरांचा वावर होता. स्मशानभूमीत स्वच्छतेची वानवा होती.शिवनेरी उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी सूर्यवंशी, उमेशचंद्र ओतारी, प्रा. अनिल फाळके, सुरेश गायकवाड, सुरेश पुजारी, वैभव इंगवले यांच्यासह सहकाऱ्यांनी शिवनेरी संस्थेच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. स्मशानभूमीतील सर्व गवत झाडे, झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली. परिसरात अभियंता उमेश ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारानजीक आत जाणाऱ्या रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसवून दुतर्फा शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. ठिबक सिंचन करण्यात आले आहे. इतर झाडांचीही वाढ होत आहे. संस्थेचे सर्व कार्यकर्ते दाहिनी शेडचीही स्वच्छता करतात. कूपनलिकेवर विद्युत मोटार बसवून त्यातील पाणी एका टाकीत साठविण्यात येते. त्याला नळ बसविला आहे. या नळाचे पाणी सर्वांना उपयोगी पडत आहे.

माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिवनेरी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात येत आहे. विविध प्रकारची झाडे लावल्याने व रंगकाम केल्याने स्मशानभूमीचा परिसर फुलला आहे. नागरिकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- तानाजी सूर्यवंशी,
शिवनेरी संस्था

Web Title: Cleanliness of crematorium from Shivneri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.