आष्ट्यात शिवनेरी संस्थेकडून स्मशानभूमीची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:34+5:302021-02-07T04:24:34+5:30
सुरेंद्र शिराळकर आष्टा : येथील शिवनेरी सेवाभावी संस्थेने कदमवेस येथील अमरधाम स्मशानभूमीत फळांची, फुलांची तसेच शोभेची झाडे लावून ...

आष्ट्यात शिवनेरी संस्थेकडून स्मशानभूमीची स्वच्छता
सुरेंद्र शिराळकर
आष्टा : येथील शिवनेरी सेवाभावी संस्थेने कदमवेस येथील अमरधाम स्मशानभूमीत फळांची, फुलांची तसेच शोभेची झाडे लावून परिसराची स्वच्छता ठेवली आहे. येथे आल्यानंतर बगिच्यात आल्याचे समाधान मिळत आहे.
आष्टा शहरातील कदमवेस येथे पालिकेच्या वतीने स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. २०१५ पूर्वी दोन दाहिनी शेड उभारण्यात आली, मात्र काटेरी झाडेझुडपे व गवत उगवल्याने परिसर अस्वच्छ होता. काही ठिकाणी पाणी साचल्याने डुकरांचा वावर वाढला होता. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे परिसरातील स्वच्छता वेळेवर होत नव्हती.
आष्टा शहरातील शिवनेरी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष तानाजीराव सूर्यवंशी यांनी शिवनेरी सेवाभावी संस्थेची स्थापना केली व या संस्थेच्या वतीने माजी आमदार विलासराव शिंदे व पालिकेकडे अमरधाम स्मशानभूमी विकसित करण्यासाठी परवानगी मागितली.
पालिकेने मान्यता दिल्यानंतर तानाजी सूर्यवंशी, अभियंता उमेशचंद्र ओतारी यांनी आराखडा तयार करून परिसराची स्वच्छता केली.
प्रवेशद्वारापासून दोन्ही बाजूला शोभेची झाडे, तसेच वड, पिंपळ, उंबर, लिंब, बेल यांसह विविध फुलाफळांची झाडे लावली. येथे पालिकेची कूपनलिका होती. त्यात मोटार सोडून पाण्याची टाकी बसवली आहे. झाडांना ठिबकच्या साह्याने नियमित पाणी मिळते. पेव्हिंग ब्लॉक बसवून लोकांना बसण्यासाठी बाक ठेवण्यात आले आहेत. पालिकेने दोन ठिकाणी गॅलरी उभारल्या आहेत. संस्थेच्या वतीने नियमित स्वच्छता करण्यात येत आहे. त्यामुळे येथे आल्यानंतर सर्वांना बगिच्यात आल्याचे समाधान मिळत आहे. अध्यक्ष सूर्यवंशी, उमेशचंद्र ओतारी, प्रा. अनिल फाळके, अधिक गायकवाड, सुरेश पुजारी, अमर महाजन परिसराची नियमित स्वच्छता करीत आहेत.
फोटो : १. आष्टा येथील अमरधाम स्मशानभूमीची स्वच्छता करताना अध्यक्ष तानाजी सूर्यवंशी व सहकारी.
२. अमरधाम स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला शोभेची झाडे लावल्याने बगिच्यात आल्याचे समाधान मिळत आहे.