सदानंद औंधेमिरज : मिरजेत मंगळवार पेठेत चर्च जवळ पूर्व वैमनस्यातून तरुणांच्या दोन गटात हाणामारी झाली. दरम्यान, गावठी पिस्तूलातून गोळीबार करत सलून दुकानाची मोडतोड करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. वडर गल्लीत तरुणांच्या जुन्या वादातून ही घटना घडली.आज, बुधवारी दुपारी चर्चजवळ वैभव यादव याच्या सलून दुकानासमोर दोन गट भिडले. काठ्याने एकमेकांवर हल्ला चढवून यादव यांच्या सलून दुकानातील सर्व साहित्याची मोडतोड केली. यावेळी गावठी पिस्तुलातून रस्त्यावर एक गोळी झाडण्यात आली. गोळीबाराच्या आवाजामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली. या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात दहशत निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक प्रणील गिलडा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे, मिरज शहर निरीक्षक किरण रासकर घटनास्थळी दाखल झाले. झाडलेल्या गोळीचे रस्त्यावर पडलेले रिकामे काडतूस पोलिसांनी जप्त केले असून याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार प्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.
Sangli: मिरजेत पूर्ववैमनस्यातून तरुणांच्या दोन गटात हाणामारी, गावठी पिस्तुलातून गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:45 IST