देवराज पाटील, बर्डे, लिंबाजी पाटील यांचा दावा
By Admin | Updated: June 14, 2016 00:21 IST2016-06-13T23:24:26+5:302016-06-14T00:21:02+5:30
दिग्गजांची मोर्चेबांधणी : जि. प. अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित

देवराज पाटील, बर्डे, लिंबाजी पाटील यांचा दावा
कासेगाव : आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे इच्छुक उत्साहित झाले आहेत. कासेगाव जि. प. गटातून माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, वाळवा पंचायत समितीचे सभापती रवींद्र बर्डे, तर नेर्ले जि. प. गटातून माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांची अध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदारी मानली जात आहे. परंतु निवडणूक लढविताना मतदार संघात कोणते आरक्षण पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्यामुळे देवराज पाटील यांना अध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यांच्यामुळेच रवींद्र बर्डे, लिंबाजी पाटील यांनाही संधी मिळाली. देवराज पाटील यांच्यारुपाने तब्बल ४0 वर्षानंतर वाळवा तालुक्याला जि. प. अध्यक्ष पदाचा सन्मान मिळाला. आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवराज पाटील यांनी जिल्ह्याचा संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न केला. राज्यात विक्रमी मतांनी विजय मिळवून त्यांनी आपली छाप सोडली.
याच गटातील रवींद्र बर्डे यांनीही वाळवा पं. स.च्या सभापतीपदी प्रभावीपणे काम केले आहे. अनुभवी, उत्कृष्ट वक्ते व प्रशासनावर पकड असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत.
नेर्ले जि. प. गटातून माजी जि. प. उपाध्यक्ष लिंबाजी पाटील हेही शर्यतीत आहेत. उपाध्यक्ष पदाच्या कार्यकालात त्यांनी त्यांच्या मतदार संघात मोठा विकास निधी खेचून आणला. सध्या ते य. मो. कृष्णा साखर कारखान्यावर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
एकंदरीत राष्ट्रवादीचे हे तीन शिलेदार आगामी जि. प. अध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार आहेत. आमदार जयंत पाटील कोणाला संधी देणार, हे येणारा काळच ठरवणार आहे. सध्या तरी या तीन दिग्गज नेत्यांचे लक्ष मतदार संघाच्या आरक्षणाकडे लागले आहे. (वार्ताहर)
जयंतरावांकडे लक्ष
माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, सभापती रवींद्र बर्डे यांचा जि. प. मतदारसंघ एकच आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील कोणाला संधी देणार? याची चर्चा सुरु आहे. जर या मतदार संघातील आरक्षण वेगळे पडले, तर देवराज पाटील, रवींद्र बर्डे वेगळा मतदारसंघ निवडणार का? याबाबतही तर्क—वितर्क लढवले जात आहेत.