शहरातील पाणीप्रश्नी नगरसेवक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:06+5:302021-03-24T04:25:06+5:30
सांगली : सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांतील पिण्याच्या पाण्यावरून मंगळवारी पालकमंत्र्यांकडे नगरसेवकांनी गाऱ्हाणे मांडले. वाॅर्डात तासभरही पाणी ...

शहरातील पाणीप्रश्नी नगरसेवक आक्रमक
सांगली : सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांतील पिण्याच्या पाण्यावरून मंगळवारी पालकमंत्र्यांकडे नगरसेवकांनी गाऱ्हाणे मांडले. वाॅर्डात तासभरही पाणी येत नाही, त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यावर तोडगा काढावा, अशी मागणीही नगरसेवकांनी केली.
कुपवाडच्या नगरसेवकांनी तर सांगलीलाच पाणी पळविले जात असल्याचा आरोप केला. दरम्यान, रस्ता रुंदीकरणासाठी वाॅर्डातील लहान-मोठ्या कामांसाठी स्वतंत्र निधीची मागणी काहींनी केली.
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पाण्याच्या प्रश्नांवरून नगरसेवक आक्रमक झाले होते. विजय घाडगे म्हणाले की, दिवसभरात पाऊण ते सव्वा तास पाणीपुरवठा होतो. माळ बंगला येथे ७० एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र आहे; पण ५० एमएलडी पाणी उपसा होत आहे. हे सारे पाणी सांगलीला जाते. कुपवाडमध्ये ११ टाक्या उभारल्या आहेत. तरीही एमआयडीसीकडून पाणी घ्यावे लागते. टाक्याच्या खाली असणाऱ्या उपनगरातही पाणी मिळत नाही. पाणीपुरवठा विभागाकडे कार्यकारी अभियंता नाही. या पदावर सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
संजय मेंढे, संगीता हारगे, वहिदा नायकवडी यांनीही मिरजेत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची तक्रार केली. शेडजी मोहिते यांनी, कुपवाड शहराला निधी वाटपात सतत अन्याय होतो. त्यामुळे ग्रामपंचायतीसारखी स्थिती आजही कायम आहे. कुपवाडच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी देण्याची मागणी केली. विष्णू माने यांनी पाणीपट्टीची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. घरपट्टीप्रमाणे पाणीपट्टीची शास्ती व दंडमाफीबाबत शासनस्तरावरून आदेश व्हावे, अशी मागणी केली. याबाबत शासनाला पत्र देण्याची सूचना मंत्री पाटील यांनी केली.
चौकट
वारणा योजना पूर्ण करा : जयश्री पाटील
वारणा नदीतून सांगली व कुपवाड शहराला पाणी देण्यासाठी योजना आखली होती. ही योजना मदनभाऊंचे स्वप्न होते. त्यातील पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्यांची कामे झाली आहेत. आता वारणा नदीतून पाणी उचलण्याचे नियोजन करून हे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी केली.