ढालगावसह नागज, आरेवाडी, कदमवाडी, शिंदेवाडी, दुधेभावी, ढोलेवाडी, विठ्ठलवाडी, केरेवाडी, निमज, ढालेवाडी, चोरोची, चुडेखिंडी, जांभुळवाडी या गावांसाठी सहायक अभियंता, मुख्य तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ, आठ बाह्यस्रोत कर्मचारी अशा ११ कर्मचाऱ्यांची संख्या आहेत. तरीही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे वीज वसुलीसारखे महत्त्वाचे कामही नाही. आरेवाडी येथील एका ग्राहकाचे वीज कोटेशन कर्मचाऱ्याने भरलेच नव्हते. उलट त्या ग्राहकालाच दाबात घेण्याचा प्रकार घडला. शेवटी त्याने ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर तक्रार केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला वीज वितरण कंपनीने समज दिली. कोटेशनचे पैसेही भरायला लावले. तरीही संबंधित कर्मचाऱ्यात सुधारणा झाली नाही. कारवाई न झाल्याने त्यास अभयच मिळाल्यासारखे झाले आहे.
ढालगाव येथील कोविड सेंटरमधील वीज गेल्या आठवड्यात रात्री खंडित झाली होती. यावेळी कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हते. वास्तविक येथील वीज वितरण कंपनीमध्ये चार वायरमनची निवासाची सोय आहे. परंतु एकही कर्मचारी येथे वास्तव्यास नाही. ढालगाव, नागजसह १४ गावांची लोकसंख्या ३० हजार आहे. आरेवाडीतील ‘ब’ दर्जाचे बिरोबा देवस्थान, ढालगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड सेंटर, पोलीस औट पोस्ट या कर्मचाऱ्यांअभावी रामभरोसे आहे. वीज जोडणीसाठी ग्राहकांनी विचारणा केल्यावर, तांत्रिक दोषाबाबत विचारल्यानंतर वायरमन उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यातूनही एखाद्याने वरिष्ठांकडे तक्रार केलीच तर ‘साहेबांकडे तक्रार करताय... जावा त्यांच्याकडेच’, अशी मग्रुरीची उत्तरे मिळतात. संबंधित कर्मचाऱ्यावर केव्हा कारवाई होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
वायरमनच्या कारभाराबद्दल सहायक अभियंत्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी मोबाईलवर संपर्क साधला असता तोही बंद होता.
चौकट
शेतीची वीज जोडणीही बंद
शेतीच्या वीज जोडणीचे कोटेशन देणे तीन महिने बंद आहे. याबाबत सहायक अभियंता सुशील हिप्परगी यांना विचारले असता त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडूनच कोटेशन प्रक्रिया बंद असल्याचे उत्तर दिले.