कणदूर परिसरात बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:29+5:302021-03-24T04:24:29+5:30
पुनवत : कणदूर, ता. शिराळा येथे आठवड्यात दोन वेळा बिबट्याचा हल्ला झाल्याने परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत. बिबट्याचे सहजीवन समजून ...

कणदूर परिसरात बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत
पुनवत : कणदूर, ता. शिराळा येथे आठवड्यात दोन वेळा बिबट्याचा हल्ला झाल्याने परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत. बिबट्याचे सहजीवन समजून घ्या, असा सल्ला वन विभाग देत असले तरी, एखाद्या माणसाच्या जीविताला धोका झाला, तर त्याला कोण जबाबदार, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
कणदूर येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. आठवड्यात गावात दोन ठिकाणी बिबट्याचा हल्ला झाला आहे. त्यामध्ये संपत सदाशिव पाटील यांचे वासरू व आनंदा बबन पाटील यांच्या दोन शेळ्या बिबट्याने मारल्या आहेत. कणदूर गावाच्याभोवती विस्तीर्ण शिवार व डोंगररान सुद्धा आहे. त्यामुळे बिबट्यासारख्या वन्यजिवाच्या अधिवासास येथे पुरेसा वाव आहे. जनावरांच्या शंभरावर वस्त्या गावाच्या बाहेर आहेत. बिबट्याचे हल्लासत्र असेच सूर राहिले तर जनावरेच काय, एखाद्या माणसालासुद्धा जीव गमवावा लागेल, अशी शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यात बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. शासनाकडून बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीबद्दल मिळणारी मदत तुटपुंजी आहे. अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह जनावरांवर अवलंबून आहे. अशी जनावरे दगावत राहिली तर जगायचे कसे, असा सवाल नागरिक करीत आहेत. शासनाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.