गणेशोत्सवात मंडपातून दर्शनासाठी नागरिकांना मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:34+5:302021-09-10T04:33:34+5:30
सांगली : गणेशोत्सवात प्रत्यक्ष मंडपात येऊन गणेश दर्शनाला प्रतिबंध करण्यात आला आहे. ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दर्शनाची सुविधा मंडळांनी ...

गणेशोत्सवात मंडपातून दर्शनासाठी नागरिकांना मनाई
सांगली : गणेशोत्सवात प्रत्यक्ष मंडपात येऊन गणेश दर्शनाला प्रतिबंध करण्यात आला आहे. ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दर्शनाची सुविधा मंडळांनी उपलब्ध करून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. उत्सवाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांव्यतिरिक्त इतरांना प्रतिबंध असेल.
जिल्हाधिकारी म्हणाले की, हा आदेश १० ते २० सप्टेंबर या कालावधीत लागू राहील. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, रॅली, मोर्चे व मिरवणुकांनाही मनाई असेल. मंडळे किंवा डॉल्बी मालकांना डॉल्बी यंत्रणेचा वापर करता येणार नाही. डॉल्बी उपकरणे व यंत्रसामग्री स्वत:कडेच सीलबंद स्थितीत ठेवावी. डॉल्बीविषयीचा आदेश ९ ते २२ सप्टेंबरदरम्यान लागू राहील. रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे, त्यामुळे गणेशोत्सवात गणपतीच्या आगमन व विसर्जनावेळी काही मंडळांकडून सवाद्य मिरवणुका काढल्या जाण्याची शक्यता आहे; पण त्याला परवानगी नाही. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात आले आहे. गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणुका काढून डॉल्बी यंत्रणेचा वापर करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईवेळी मंडळाचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, संघटनांचे नेते यांच्याकडून विरोध होऊ शकतो, तणावातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यावरही लक्ष ठेवल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. प्रसंगी ध्वनिक्षेपक यंत्रणा ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.