यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी जागा देण्यास नागरिकांचा विराेधच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:27 IST2021-09-03T04:27:44+5:302021-09-03T04:27:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क देवराष्ट्रे : माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे जन्मस्थळ असलेल्या देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील स्मारक विकासासाठी जमीन ...

Citizens are against giving space for Yashwantrao Chavan memorial | यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी जागा देण्यास नागरिकांचा विराेधच

यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी जागा देण्यास नागरिकांचा विराेधच

लोकमत न्यूज नेटवर्क

देवराष्ट्रे : माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे जन्मस्थळ असलेल्या देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील स्मारक विकासासाठी जमीन देण्यास शेजारील मालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबंधित जागा मालकांना पाचपट मोबदल्यासह तेवढीच जागा गावात अन्य ठिकाणी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, तोही त्यांनी फेटाळला आहे. यामुळे स्मारक जागेचा तिढा कायम राहिला आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकासाठीच्या जागेचा वाद मिटवण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी देवराष्ट्रेत १७ जागामालक, अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतीत बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास राहणे, तहसीलदार शैलजा पाटील, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, सरपंच प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण यांची २०१४मध्ये जन्मशताब्दी झाली. या प्रश्नावर मार्ग काढण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी गुरुवारी देवराष्ट्रे गावाला भेट देऊन जन्मस्थळाशेजारील १७ जागा मालकांशी थेट संवाद साधला. संबंधित जागा मालकांनी पेठ भागातील मोक्याची जागा देण्यास विरोध दर्शविला. ही जागा स्मारकासाठी गेली तर आमचे व्यावसायिक नुकसान होणार आहे आणि पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शासनाने बळजबरी केली तर प्रसंगी आत्मदहन करू, असा इशारा या जागा मालकांनी दिला. ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना याविषयी निवेदनही दिले.

चौकट

ग्रामस्थांनी चांगला प्रस्ताव स्वीकारावा : अभिजीत चौधरी

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, शासनाच्या नव्या धोरणानुसार कोणाचे नुकसान होणार नाही, असा लाभ देण्याची शासनाची तयारी आहे. भूमी संपादनाच्या नव्या धोरणानुसार जेवढी जागा घेतली जाईल त्याच्या रेडिरेकनरच्या पाचपट रक्कम शासन देणार आहे. ग्रामपंचायतीनेसुद्धा जागेच्या मोबदल्यात तेवढीच जागा देण्याची संमती दर्शवली आहे. हा चांगला प्रस्ताव असून, ग्रामस्थांनी तो मान्य करावा. यशवंतराव चव्हाण यांचे जन्म स्मारक हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले आहे. त्यामुळे या जन्मस्थळाच्या परिसरात कोणालाही नवी बांधकामे करता येणार नाहीत.

चौकट

जागा जबरदस्तीने घेणार नाही : गणेश मरकड

शासनाने २०१७मध्ये यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी जागा संपादित केली आहे. आम्हाला कोणाचीही जागा बळजबरीने घ्यायची नाही. जबरदस्तीही करणार नाही. फक्त विकासासाठी जागा मालकांनी सहकार्य करावे, असे मत प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी व्यक्त केले.

Web Title: Citizens are against giving space for Yashwantrao Chavan memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.