नागरिकांनी व प्रशासनाने संयमाने परिस्थिती हाताळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST2021-07-27T04:28:06+5:302021-07-27T04:28:06+5:30
शिराळा : शिराळा विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टी व वारणा-मोरणा नदीच्या पुराने मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांनी व प्रशासनाने संयमाने परिस्थिती ...

नागरिकांनी व प्रशासनाने संयमाने परिस्थिती हाताळावी
शिराळा : शिराळा विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टी व वारणा-मोरणा नदीच्या पुराने मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांनी व प्रशासनाने संयमाने परिस्थिती हाताळावी. झालेल्या नुकसानाचे पंचनामे होऊन शासनाकडून मदत केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
शिराळा मतदार संघातील वारणा व मोरणा नदी काठावरील गावांचा त्यांनी आमदार मानसिंगराव नाईक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्यासोबत दौरा केला, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.
पाटील म्हणले, ‘‘शिराळा मतदार संघातील भरतवाडी, कणेगाव, तांदूळवाडी, बहादूरवाडी, ऐतवडे खुर्द, चिकुर्डे, कुरळप, ठाणापुढे, देववाडी, मांगले, शिराळा, पेठ, कासेगाव व तांबवे गावांचा दौरा केला. पूरपरिस्थितीची व नुकसानाची पाहणी केली आहे. मुसळधार पावसामुळे शेती, पिके, घरे, जनावरांची वस्त्या, दुकाने व माल, रस्ते, पूल, साकव, पानंदी आदींचे प्रचंड नुकसान झाले आहे.’’
आमदार नाईक म्हणाले, ‘‘मुसळधार पावसामुळे नदीभाग सोडून इतर भागातील ओढे, ओघळीतून आलेल्या व सखल भागात पाणी साठवून राहिले आहे. त्यामुळे नुकसान झाले आहे. सर्व नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश आहेत. स्थलांतरित करण्यात आलेल्या गावातील लोकांची राहण्याची व भोजनाची सोय करण्यात आली आहे. माणसांच्या व पशुधनाच्या आरोग्याबाबत काही समस्या निर्माण झाल्यास दोनीही यंत्रणा सज्ज आहेत.
कणेगावपासून सुरू झालेला दौरा तांबवे येथे संपला. त्यांच्यासमवेत तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल. वाळव्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस, गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.