कामगार रुग्णालयातील डॉक्टरांना घेराओ
By Admin | Updated: April 2, 2015 00:37 IST2015-04-01T23:35:55+5:302015-04-02T00:37:10+5:30
पक्ष, संघटनांचे आंदोलन : रुग्णांना बाहेरील जिल्ह्यात पाठविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

कामगार रुग्णालयातील डॉक्टरांना घेराओ
सांगली : येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या डॉक्टर जयश्री जावडेकर यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करुन, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना व वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेकडून घेराव घालण्यात आला. या योजनेला संलग्न रुग्णालये सांगली जिल्ह्यात असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयाकडे रुग्ण जबरदस्तीने पाठविण्यात येतात, असा आरोप यावेळी करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय समाज पक्षाचे संजय लवटे, शिवसेनेचे शंभोराज काटकर यांनी केले.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामगार विमा योजनेचे चांगल्या दर्जाचे रुग्णालय असतानाही या रुग्णालयातून कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण पाठविण्यात येतात. यापाठीमागे त्यांचा वैयक्तिक स्वार्थ जडलेला दिसतो. या रुग्णालयात औषधाचाही तुटवडा आहे. याची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई करण्यात यावी. या रुग्णालयाकडून रुग्णांना हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. रुग्णांना कोल्हापूर जिल्ह्यात पाठविल्याने त्यांना नाहक प्रवास खर्च, जेवण व औषधांच्या खर्चाचा भुर्दंड बसत आहे. याची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनामध्ये सर्जेराव गायकवाड, लीना यादव, वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष मारुती नवलाई, कल्पना कोळेकर, चिन्मय हंकारे आदी सहभागी झाले होते. सुमारे तासभर आंदोलन सुरु होते. यावेळी अधिकाऱ्यांशी वादावादीही झाली. पुणे येथील वरिष्ठ अधिकारी डॉ. एस. एन. भागवत यांनी यासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर दुपारी आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी रुग्णालयामध्ये गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)
आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
आंदोलनकर्त्यांनी पुणे विभागाचे आरोग्य विभागाचे सचिव एस. एन. भागवत यांच्याशी संपर्क साधला. यावेळी डॉ. भागवत यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. दुपारी ते रुग्णालयात आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर काही रुग्णांचेही म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. रुग्णालयात लवकरच सुधारणा करण्यात येईल, संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासनही आंदोलनकर्त्यांना त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनावेळी रुग्णालयातील संजय शिंदे या कर्मचाऱ्याला भोवळ आल्याने तो खाली कोसळला. यामुळे रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्याला पाणी देण्यात आले.