कुपवाडमध्ये पालिका सहायक आयुक्तांना घेराओ
By Admin | Updated: November 25, 2014 23:49 IST2014-11-25T23:14:32+5:302014-11-25T23:49:33+5:30
काँग्रेसचे आंदोलन : समस्यांचा निपटारा न झाल्यास हंटरफोड आंदोलन

कुपवाडमध्ये पालिका सहायक आयुक्तांना घेराओ
कुपवाड : शहरातील स्वामी मळा, शिवनेरीनगर, खारे मळ्यासह इतर उपनगरांतील नागरी समस्यांप्रकरणी आज (मंगळवारी) शहर काँग्रेसच्यावतीने प्रभाग समिती तीनचे सहायक आयुक्त चंद्रकांत चौधरी यांना घेराओ घालण्यात आला. यावेळी महापालिका प्रशासनाच्या नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेबद्दल जाब विचारण्यात आला. येत्या आठ दिवसांत या समस्यांचा निपटारा न झाल्यास हंटरफोड आंदोलन करण्याचा इशाराही त्यांच्यावतीने देण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाच्या विरोधातील हे आंदोलन नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. प्रभाग समिती क्रमांक तीनच्या प्रशासनाकडून शहरासह उपनगरात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सिध्दार्थनगरमध्ये कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. गटारीची स्वच्छताही केली जात नाही. खारे मळ्यामध्ये गटारीचे काम निकृष्ट झाले आहे. शिवनेरीनगरमध्येही स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. मेन रोडवर मटण विक्रेत्यांकडूनही बेकायदा बोकडांची कत्तल केली आहे. त्याचे पाणी धार्मिक स्थळाकडे जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमधून संतापाची लाट पसरली आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज नगरसेवक मगदूम यांनी नागरिकांसमवेत जाऊन प्रभाग तीनच्या अधिकाऱ्यांना विविध समस्यांप्रकरणी जाब विचारला. शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासह मुख्य रस्त्याच्या पॅचवर्कचे काम त्वरित सुरू करण्याची मागणीही यावेळी नागरिकांच्यावतीने करण्यात आली. येत्या मंगळवारपर्यंत या समस्यांचा निपटारा न केल्यास हंटरफोड आंदोलन करण्यासह महापालिका कार्यालयात कचरा टाकून अधिकाऱ्यांना गटारीच्या पाण्याने अंघोळ घालण्याचा इशाराही नगरसेवक मगदूम यांनी दिला आहे.
यावेळी अरुण रूपनर, बापूसाहेब तोडकर, सचिन पाटील, महेश निर्मळे, हणमंत सरगर, राहुल कोल्हापुरे, सनी धोतरे, आनंदा बनसोडे, प्रकाश सूर्यवंशी, कुमार बामणे, राणगे, विनायक गवळी, सुरेश ढोणे, सलीम काझी, अजित सरोदे, समीर मुजावर, संदीप कारंडे, अभिजित परीट, अज्जू पटेल आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
ठेकेदारांमुळे नुकसान
कुपवाड शहरासह उपनगरांमधून राजकीयसह इतर ठेकेदारांकडून महापालिकेची विविध विकास कामे घेतली जातात. परंतु डांबरी रस्त्यासह गटार, पॅचवर्कची ही कामे संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाची केली जातात. त्यामुळे कुपवाडचे नुकसान होत आहे. यापुढील कालावधित शहरात सुरू होणारी डांबरीकरणासह विविध कामे उत्कृष्ट व चांगल्या दर्जाची करण्यावर भर देणार आहे.