वीज कर्मचाऱ्यांचा ५ आॅक्टोबरला मुंबईत घेरावो
By Admin | Updated: September 13, 2015 22:51 IST2015-09-13T22:39:40+5:302015-09-13T22:51:58+5:30
मोहन शर्मा : कायकर्ता प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

वीज कर्मचाऱ्यांचा ५ आॅक्टोबरला मुंबईत घेरावो
सांगली : वीज कर्मचाऱ्यांच्या सर्वच प्रश्नांवर सरकारकडून दिरंगाई होत असून, शासनाला जाग आणण्यासाठी येत्या ५ आॅक्टोबरला मुंबईतील महावितरणचे कार्यालय असलेल्या ‘प्रकाशगड’ला घेराव घालण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी रविवारी सांगलीत दिला.
सांगलीत वर्कर्र्स फेडरेशनच्यावतीने कॉ. शाम केरकर कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन शर्मा यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आयटकचे सरचिटणीस सुकुमार दामले होते. शर्मा म्हणाले की, संघटनेने वीज मंडळाचे चार कंपन्यांत रूपांतर करण्यास विरोध केला होता. आता या कंपन्या तोट्यात असून, शासनाचा हजारो कोटींचा महसूल बुडाला आहे. एन्रॉन प्रकल्पालाही फेडरेशननेच प्रथम विरोध केला होता. तीस हजार रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम केले. राज्यातील ही बलाढ्य संघटना असून, या संघटनेतील कार्यकर्त्यांनी आपल्या संघटित ताकदीचा आता दलित, शोषित, कष्टकरी, असंघटित क्षेत्रातील तसेच कंत्राटी, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
सुकुमार दामले म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार भांडवलदारांचे आहे. त्यामुळे ते सांगतील तसे बदल कामगार कायद्यात केले जात आहेत. फिक्कीने अशा बदलांची यादीच केंद्र सरकारला दिली आहे. त्यानुसार निर्णय घेतले जात आहेत. सरकार आता सामान्यांचे, कर्मचाऱ्यांचे राहिलेले नाही. कामगार कायदे, जमीन अधिग्रहण, कर सवलत, स्थानिक संस्थांचे खच्चीकरण आणि पर्यावरण या पाच मुद्द्यांवर सरकार भांडवलांसमोर झुकल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी महेश श्रीमंत खरमाटे, अशोक पाटील, मनोहर जाधव, सागर जगताप, जगदीश नलावडे आदी उपस्थितीत होते. स्वागत, प्रास्ताविक महेश जोतराव यांनी केले, तर आभार शिवशंकर भस्मे यांनी मानले. (प्रतिनिधी)