मिरजेत भरदिवसा घरफोडी
By Admin | Updated: May 11, 2015 00:34 IST2015-05-11T00:34:26+5:302015-05-11T00:34:26+5:30
चोरटे पसार : सव्वा लाखाचा ऐवज लंपास; घरे, बंगले फोडण्याचे सत्र सुरूच

मिरजेत भरदिवसा घरफोडी
मिरज : मिरजेतील सुभाषनगर रस्त्यावरील समर्थ कॉलनीत भरदिवसा वकिलाचा बंद असलेला बंगला फोडून चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. यात सोन्या-चांदीचे दागिने, रोख रकमेचा समावेश आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली. रविवारी याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली.
समर्थ कॉलनीत अॅड. शकील मुजावर यांचा बंगला आहे. मुजावर यांचे कुटुंबीय परगावी गेल्याने बंगल्याला कुलूप होते. शनिवारी दुपारी बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतील कपाटाच्या किल्ल्या घेऊन कपाटातील तीन तोळे सोन्याचे दागिने, १५ हजार रोख रक्कम, १८ हजार किमतीचा एलईडी टी.व्ही. असा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.
अॅड. मुजावर शनिवारी रात्री घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी घरातील किल्ल्या घेऊन कपाट उघडल्याने माहीतगार चोरट्यांनी चोरी केल्याचा संशय आहे. चोरीबाबत मुजावर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. शहरातील विस्तारित भागात बंद असलेली घरे व बंगले फोडण्याचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. (प्रतिनिधी)