चायनीज गाडे, ढाब्यांंवरही आता कारवाई करणार
By Admin | Updated: February 2, 2015 00:15 IST2015-02-01T23:31:48+5:302015-02-02T00:15:27+5:30
डी. एच. कोळी यांचा इशारा

चायनीज गाडे, ढाब्यांंवरही आता कारवाई करणार
काही व्यावसायिक अन्नपदार्थात भेसळ करतात, पदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव ठेवतात. त्यांच्यावर कारवाईसाठी अन्न विभाग कार्यरत असतो. मध्यंतरी केंद्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न विभागाने जिल्ह्यातील १५ हॉटेलचे खाद्य परवाने रद्द केले होते. या मोहिमेचे यापुढील भवितव्य तसेच अन्नसंबंधित इतर प्रश्नांबाबत अन्न विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त डी. एच. कोळी यांच्याशी हा थेट संवाद...
४हॉटेलवरील परवाना निलंबनाच्या कारवाईसंदर्भात केंद्रीय अन्नसुरक्षा कायद्याची धोरणे काय आहेत?
- समाजात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्याला चांगले अन्न, खाद्यपदार्थ खायला मिळणे गरजेचे आहे. केवळ एवढेच नव्हे, तर जेथे अन्नपदार्थ बनविण्यात येतात तेथे स्वच्छता असणे अत्यावश्यक आहे. स्वयंपाक घरामध्ये स्वच्छ फरशा असाव्यात, भिंतींना रंगसफेदी केलेली पाहिजे, भांडी धुण्याची जागा ही स्वतंत्र असावी, कचरा टाकण्यासाठी झाकणबंद कचरापेटी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अन्न तयार करणाऱ्या वेटरनी हातमोजे व डोक्याला हेड गिअरचा वापर करणे बंधनकारक आहे. कामगारांची प्रतिवर्षी वैद्यकीय तपासणी गरजेची असून, खोलीत जळमटे असता कामा नयेत, अशी ढोबळमानाने काही मानके आहेत. मध्यंतरी जिल्ह्यात हॉटेलवर जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये याबाबत त्रुटी आढळल्या होत्या.
४विभागाने फक्त हॉटेलवरच का कारवाई केली ?
- हा चुकीचा समज आहे. आमची तपासणीची मोहीम प्रत्येक महिन्यात सुरु असते. केवळ यावेळी एकाच वेळी १५ हून अधिक हॉटेल व्यावसायिकांचे खाद्य परवाने निलंबित करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे अन्न सुरक्षा आयुक्तांकडून आम्हाला केवळ हॉटेल व्यावसायिकांची तपासणी करावी, असा आदेश प्राप्त झाल्याने यंदा आम्ही हॉटेलची तपासणी करुन संबंधितांवर कारवाई केली.
४कारवाईचा फार्स करुन आणि तात्पुरता परवाना निलंबित करुन काही साध्य होईल का?
- कारवाईचा फार्स म्हणणे योग्य नाही. तपासणी करणे व जेथे नियमबाह्य आढळेल त्या ठिकाणी कारवाई करणे आमचे कर्तव्य
आहे. तात्पुरता परवाना निलंबित करुनही जर संबंधित हॉटेल व्यावसायिकाने काही सुधारणा केली नाही, तर आम्ही पुन्हा त्या व्यावसायिकांवर कारवाई करू शकतो. तीच चूक जर दोन अथवा तीनवेळा झाली तर प्रसंगी त्या व्यावसायिकाचा परवानाही रद्द होऊ शकतो. तशी कारवाई करण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत.
४शहरातील काही चायनीजचे गाडे तसेच ढाबे यांच्यावर देखील अस्वच्छता असते. त्यांच्यावर कारवाई करणार का ?
- निश्चितच. या ठिकाणी लवकरच तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. प्रामुख्याने तेथे पिण्याचे पाणी पिण्यायोग्य असणे आवश्यक आहे. तसेच चायनीजच्या गाड्यांवर पदार्थ बनविताना ती जागा बंदिस्त असावी. जेणेकरुन रस्त्यावरुन जाणाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही.
४दूध भेसळीचा मुद्दादेखील महत्त्वाचा आहे. त्यासंदर्भात तपासणी सुरुआहे का?
- काही दिवसांपूर्वी आम्ही जिल्ह्यातील काही दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. सध्या ते नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यावर याविषयी अधिक बोलता येईल. त्याचप्रमाणे डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील काही हॉटेलमधून खाद्यपदार्थांचे नमुने घेतले होते. त्यापैकी तीन हॉटेलमधील पनीर हा खाद्यपदार्थ खराब आढळला आहे. हे सर्व नमुने विभागीय कार्यालय, पुणे येथील न्याय निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेले आहेत. तेथून संबंधितांवर कायद्यानुसार लवकरच कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या आरोग्याशी हलगर्जीपणा करणाऱ्या दोषींवर ५ लाखांपर्यंतचादेखील दंड होऊ शकतो. मात्र या कायद्यात तुरुंगवासाची तरतूद करण्यात आलेली नाही.
४वरिष्ठांचा आदेश आला तरच आपण मोहीम राबविता, की त्यामध्ये सातत्य असते?
- वरिष्ठ कार्यालयाकडून प्रत्येक महिन्यात कोणत्या संबंधात विशेष मोहीम राबवायची, याबाबत आदेश मिळतो. परंतु आमची नियमित तपासणी मोहीम सुरुअसते. प्रत्येक महिन्याला अन्नपदार्थाचे पाच नमुने व दहा हॉटेल, दुकाने आदींच्या तपासण्या करणे आम्हाला बंधनकारक आहे. जिल्ह्यात ३०० हून अधिक अन्नप्रक्रिया उद्योग आहेत. त्यांचीही नियमित तपासणी करण्यात येत आहे. त्यातूनही नागरिकांना काही आक्षेपार्ह आढळले तर, त्यांनी अन्न विभागाशी संपर्क साधल्यास त्याची तात्काळ दखल घेतली जाईल.
४भविष्यात आपण कोणती विशेष मोहीम राबविणार आहात का ?
- लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे. हल्ली बाटलीबंद पाणी पिण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण विकत घेतलेले पाणी शुध्द असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात बाटलीबंद पाण्याचे सहा प्लॅँट आहेत. तेथे पॅक करण्यात येणारे पाणी हे ब्युरो आॅफ इंडियन स्टॅन्डर्डच्या मानकानुसार असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यादृष्टीने तपासणी मोहीम गतीने राबविण्यात येणार आहे. जे दोषी असतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
४नरेंद्र रानडे