टाकळीत भावासमोरच चिमुरड्याचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST2021-09-18T04:28:38+5:302021-09-18T04:28:38+5:30

टाकळी : टाकळी (ता. मिरज) येथे चार वर्षांच्या बालकाचा भावासमोरच विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. अरुण शंकर दोडमनी ...

Chimurdya drowned in a well in front of his brother in Takli | टाकळीत भावासमोरच चिमुरड्याचा विहिरीत बुडून मृत्यू

टाकळीत भावासमोरच चिमुरड्याचा विहिरीत बुडून मृत्यू

टाकळी : टाकळी (ता. मिरज) येथे चार वर्षांच्या बालकाचा भावासमोरच विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. अरुण शंकर दोडमनी असे त्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

येथील शंकर दोडमणी शेतमजूर आहेत. अरुण हा त्यांचा मुलगा शुक्रवारी सकाळी घरापासून थोड्या अंतरावरील सुरगोंडा पाटील यांच्या पडक्या विहिरीजवळ खेळायला गेला होता. यावेळी त्याच्यासोबत सात वर्षाचा मोठा भाऊ ऋत्विक व एक मित्रही होता. विहिरीजवळ खेळत असताना कठड्यावरील शेवाळामुळे पाय घसरून अरुण पाण्यात पडला. सोबत असलेला मोठा भाऊ व मित्र घाबरून पळून गेले. आजूबाजूला कोणीही नव्हते. त्यामुळे अरुणचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

अरुण सोबत गेलेला त्याचा मोठा भाऊ ऋत्विक याने दोन तासानंतर ही घटना घरी आजीला सांगितली. त्यानंतर घरच्यांनी विहिरीकडे धाव घेतली. पाण्यात तरंगत असलेला अरुणचा मृतदेह आढळून आला. दोडमणी कुटुंबियांचा टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना कळविल्यानंतर जयकुमार गोडसे व संतोष माने यांनी पंचनामा केला. माजी उपसरपंच महावीर पाटील, अनिल पाटील, अंकुश वाघमारे, संगप्पा चौगुले, बटू ऐवळे, बाळासाहेब बनसोडे यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.

चौकट

पोलिसांची माणुसकी

दोडमणी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांना अंत्यविधी व शववाहिकेसाठी पैसे नव्हते. मात्र पंचनाम्यासाठी आलेले मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस जयकुमार गोडसे व संतोष माने यांनी बालकाच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कार व इतर खर्चासाठी स्वत:कडील पैसे दिले. त्यानंतर ग्रामस्थांनीही कुटुंबियांना मदत केली.

Web Title: Chimurdya drowned in a well in front of his brother in Takli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.