मिरजेत उंच गणेशमूर्तींवर भर
By Admin | Updated: September 22, 2015 23:29 IST2015-09-22T23:05:12+5:302015-09-22T23:29:41+5:30
सजावट व देखावे पाहण्यासाठी गर्दी : कमानी, कारंजे, विविध प्रतिकृती

मिरजेत उंच गणेशमूर्तींवर भर
मिरज : मिरजेतील गणेश मंडळांनी आकर्षक सजावट, भव्य गणेशमूर्तींची स्थापना, कमानी, कारंजे, विविध प्रतिकृती असे देखावे साकारले आहेत. यावर्षी मंडळांनी सामाजिक संदेश देणाऱ्या जिवंत देखाव्यांऐवजी उंच गणेशमूर्तींची स्थापना केली आहे.
सांगलीवेस गणेशोत्सव मंडळाने ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ हा देखावा केला आहे. मंडळाने उभारलेल्या कमानीवर राजमाता जिजाऊंसह सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या प्रतिमा आहेत. उदगाव वेस येथील सर्वोदय गणेशोत्सव मंडळाने शोले चित्रपटातील ‘गब्बर’ या व्यक्तिरेखेवर विनोदी देखावा साकारला आहे. वीरशैव कक्कय्या समाज गणेश मंडळाने बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविले आहे. ब्राह्मणपुरीतील विश्व चौक गणेशोत्सव मंडळाची २२ फूट उंच खंडोबाची मूर्ती आहे. देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. तानाजी चौक गणेश मंडळाने राधाकृष्ण रूपातील उंच गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. २५ फूट लांब व कुंभार खण येथील कृष्णेश्वर गणेश मंडळाची तांडव नृत्य करणाऱ्या गणेशाची २१ फूट उंचीची गणेशमूर्ती आहे. वीरभद्र मंडळाचा बैलावर आरूढ शंकराचा देखावा आहे. ब्राह्मणपुरीतील भारतमाता व मंगळवार पेठेतील कुंकुवाले गणेश मंडळाने आकर्षक संगीत रोषणाई केली आहे. मंगळवार पेठेतील गजराज मंडळाची चांदीची गणेशमूर्ती व शिवाजी चौक मंडळाची १८ फूट उंचीची आकर्षक गणेशमूर्ती आहे.कनवाडकर हौद येथील शिवगर्जना मंडळाने १९ फूट उंच सिंहासनारूढ गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. कर्मवीर चौकातील महागणपती मंडळाने २० फूट उंच गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. काही मंडळांनी प्रबोधनपर साकारलेले देखावे खुले होण्यास सुरुवात झाल्याने रात्री उशिरापर्यंत गर्दी होत आहे. यावेळी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर)
सामाजिक देखाव्यांंना बगल --मिरजेतील गणेश मंडळांची सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांची परंपरा आहे. मात्र यावर्षी देखाव्यांऐवजी अनेक मंडळांच्या मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती आहेत. उंच गणेशमूर्ती, विविध मंदिरांच्या प्रतिकृती, सजावटीसह आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. पाहण्यासाठी गर्दी होत आहे.