आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांनी वडिलांना दुकानगाळ्यांचा ताबा देण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:26+5:302021-03-30T04:17:26+5:30
मिरजेतील बादशहा बागवान (वय ७७) यांना त्यांच्या मुलांनी वृद्धापकाळात संभाळ न करता, त्यांना घराबाहेर काढून त्याच्या राहत्या घरावर व ...

आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांनी वडिलांना दुकानगाळ्यांचा ताबा देण्याचा आदेश
मिरजेतील बादशहा बागवान (वय ७७) यांना त्यांच्या मुलांनी वृद्धापकाळात संभाळ न करता, त्यांना घराबाहेर काढून त्याच्या राहत्या घरावर व दुकानगाळ्यावर मुलांनी कब्जा केला होता. याबाबत बादशहा बागवान यांनी माता-पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियमानुसार मिरज प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. माजी आमदार शरद पाटील यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले.
बागवान यांच्या अर्जावर सुनावणी होऊन प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी मुलांच्या ताब्यात असणाऱ्या मिरज लक्ष्मी मार्केटमधील दुकान गाळ्यांचा वडिलांना ताबा देण्याचे आदेश दिले. त्यामुळे बादशाह बागवान यांना न्याय मिळाला. प्रांताधिकाऱ्यांच्या निकालाने वृद्ध पालकांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना चपराक बसली आहे. वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलांच्या विरोधात वृद्ध नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियमानुसार न्याय मागता येतो. त्यामुळे असा अन्याय झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन माजी आमदार शरद पाटील यांनी केले.