मुलांना सहा वर्षानंतरच शाळेत पाठवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:23+5:302021-02-15T04:23:23+5:30
शिरटे : मुलांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासासाठी त्यांना सहा वर्षानंतरच शाळेत पाठवावे. सहा वर्षापर्यंत आईच्या खांद्या-मांडीवरती खेळणारी ...

मुलांना सहा वर्षानंतरच शाळेत पाठवावे
शिरटे : मुलांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासासाठी त्यांना सहा वर्षानंतरच शाळेत पाठवावे. सहा वर्षापर्यंत आईच्या खांद्या-मांडीवरती खेळणारी मुलंच जगातील सर्वात हुशार मुलं बनल्याशिवाय राहणार नाहीत, असे मत शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी व्यक्त केले.
भवानीनगर (ता. वाळवा) येथे जागृती साहित्य संस्कार मंडळाच्यावतीने आयोजित कवयित्री शैला सायनाकर स्मृती व्याख्यानमालेत ‘मी कसा घडलो’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुडाळकर म्हणाले, आई ही परिस्थितीचा बाऊ करणारी नसावी तर ती परिस्थितीवर विजय मिळवणारी असावी. जीवघेण्या स्पर्धेच्या युगात ज्या वयात आईच्या माया-ममतेची गरज असते, त्याच वयात मुलांना शाळेत घातले जाते. त्यामुळे मुलांचे बालपण हरवत चालले आहे. ज्या आई-वडिलांचे उच्चशिक्षण झाले आहे, त्यांनीच आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवावे. आई-वडिलांनी योग्यवेळी मुलांच्या हाती पुस्तके दिली तर घराघरात साने गुरुजी तयार होतील. जागृती मंडळाच्या व्याख्यानमालेतील संस्काराच्या दालनातून निश्चितच स्वामी विवेकानंदांसारखी मुले निर्माण होतील, असे कुडाळकर यांनी सांगितले.
सुवर्णा कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर सचिन गोडसे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. स्वाती मोहिते यांनी सूत्रसंचालन केले तर धनश्री राजहंस यांनी आभार मानले.