कृष्णा वाचविण्यासाठी मुख्यमंत्री मदत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2015 00:30 IST2015-07-29T23:33:12+5:302015-07-30T00:30:12+5:30

संचालकांना आश्वासन : सुरेश भोसले, अतुल भोसलेंची भेट

The Chief Minister will help Krishna to save | कृष्णा वाचविण्यासाठी मुख्यमंत्री मदत करणार

कृष्णा वाचविण्यासाठी मुख्यमंत्री मदत करणार

इस्लामपूर : य. मो. कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित संचालकांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सुरेश भोसले यांनी कृष्णा कारखान्याच्या सद्यस्थितीचा आढावा मांडला. कारखान्याकडील शासकीय देणी भागविण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असे साकडे मुख्यमंत्र्यांना घातले. या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी, कृष्णा कारखान्याच्या भवितव्यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
मुंबईत विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या भेटीप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्यासमवेत उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, संचालक धोंडीराम जाधव, जितेंद्र पाटील, कृष्णा बँकेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले आदी उपस्थित होते.
डॉ. सुरेश भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर कारखान्याच्या सद्यस्थितीचा आढावा मांडला. कारखान्यावर सध्या ५२० कोटी रुपयांचे कर्ज व देणी आहेत. विविध करासह सुमारे ५० कोटी रुपयांची शासकीय देणी बाकी आहेत. ही देणी भागविण्यासाठी मुदतवाढ मिळावी, कर्जहप्ते पुनर्गठित करण्याबाबतचा शासननिर्णय होईपर्यंत वसुलीस स्थगिती मिळावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी, कारखान्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करण्याची आणि कृष्णा कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. (वार्ताहर)

सभासदांना फायदा : भोसले
सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्याशीही कर्ज आणि अन्य प्रश्नावर चर्चा झाली. सकारात्मक चर्चेमुळे संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले असून, कृष्णा कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना याचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The Chief Minister will help Krishna to save

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.