छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:57+5:302021-04-02T04:27:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा लवकरच कायापालट होणार आहे. या क्रीडांगणाच्या ...

छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा होणार कायापालट
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा लवकरच कायापालट होणार आहे. या क्रीडांगणाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीतून १ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी गुरुवारी दिली. यामध्ये क्रिकेट मैदान, ॲथलेटिक ट्रॅक व आरसीसी गटार आदी कामांचा समावेश आहे. सांगली शहरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी दोन मोठी क्रीडांगणे आहेत. दोन्हीही क्रीडांगणांची अवस्था चांगली नाही. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर दररोज हजारो खेळाडू सराव करतात. तसेच नागरिकही व्यायामासाठी येतात, पण सुविधा नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजी होती. त्यामुळे या क्रीडांगणाचा विकास करण्याची मागणी जोर धरू लागली होती. आयुक्त नितीन कापडणीस यांनी क्रीडांगणाच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार बांधकाम विभागाने ३ कोटी १९ लाख ८२ हजार २११ रुपयांचा आराखडा तयार केला.
दरम्यान, पालकमंत्री जयंत पाटील यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली होती. त्यावेळीही या क्रीडांगणाच्या विकासाचा मुद्दा चर्चेला आला होता. पालकमंत्री पाटील यांनी क्रीडांगण विकासासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्याची ग्वाही दिली होती.
या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे. तसेच १ कोटी ५९ लाख ९१ हजार १०५ रुपयांचा निधीही जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला आहे. यापैकी ५३ लाख ८४ हजारांचा निधी महापालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. या निधीमधून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा कायापालट होणार आहे.
चौकट
प्रस्तावित कामे
जिल्हा नियोजन समितीने १ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून क्रिकेट मैदानाची सुधारणा, ॲथलेटिकसाठी सहा नवीन ट्रॅक व पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी आरसीसी गटार अशी कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच सांगलीकरांना एक अद्ययावत क्रीडांगण
मिळणार आहे.