बुद्धिबळ : सांगलीचा समीर कठमाळे चौथा
By Admin | Updated: September 17, 2014 23:43 IST2014-09-17T23:35:12+5:302014-09-17T23:43:56+5:30
तेजकुमारला विजेतेपद

बुद्धिबळ : सांगलीचा समीर कठमाळे चौथा
पुणे : श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत नवव्या फेरीअखेर कर्नाटकच्या आयएम तेजकुमार एम. एस. याने आपली आघाडी कायम ठेवत आठ गुणांसह अव्वल क्रमांकासह विजेतेपद पटकावले.
मनोहर मंगल कार्यालय, एरंडवणे, पुणे येथे आज संपलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीअखेर कर्नाटकच्या व अव्वल मानांकित आयएम तेजकुमारने (२४३९) रेल्वेच्या आयएम राहुल संगमाचा पराभव करीत विजय मिळविला. ३३ वर्षीय तेजकुमारने २६ चालींमध्ये क्विन्स् इंडिया पद्धतीने सुरुवात करीत राहुलवर विजय मिळवीत ५२.५ बुकोल्स् कट गुण सरासरीच्या आधारावर प्रथम क्रमांक पटकावला. तेजकुमारचे या वर्षातील हे पहिलेच विजेतेपद आहे.
रेल्वेच्या आयएम हिमांशू शर्माने रेल्वेच्याच सौरव खेर्डेकरला बरोबरीत रोखून ७.५ गुणांसह व ५२ बुकोल्स् कट गुण सरासरीच्या आधारावर दुसरा क्रमांक पटकावला. नागपूरच्या स्वप्निल धोपाडेने मुंबईच्या राकेश कुलकर्णीचा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला. समीर कठमाळेने सात गुणांसह चौथा क्रमांक, तर पुण्याच्या अभिषेक केळकरने सात गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला. आठ वर्षांखालील गटात आदित्य समंतने प्रथम, तर वंश अगरवालने द्वितीय क्रमांक पटकावला १० वर्षांखालील पहिला क्रमांक दिल्लीच्या ओम खरोलाने, तर दुसरा क्रमांक गोव्याच्या ओम बर्देने मिळविला. १२ वर्षांखालील गटात प्रथम व द्वितीय क्रमांक संकर्ष शेळके व आदित्य कल्याणी यांनी पटकावला. १४ वर्षांखालील गटात हर्षित राजा व अवधूत लेंडे अनुक्रमे पहिले व दुसरे आले. (प्रतिनिधी)