वर्षभर कोरोनाचेच रुग्ण तपासले, इतर रुग्ण पाहायचे तरी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:21+5:302021-03-30T04:17:21+5:30
सांगली : कोरोनाचा फटका अवघ्या जगाला बसला आहे, तसाच त्रास निवासी डॉक्टरांनाही सोसावा लागत आहे. त्याचे स्वरूप मात्र काहीसे ...

वर्षभर कोरोनाचेच रुग्ण तपासले, इतर रुग्ण पाहायचे तरी कधी?
सांगली : कोरोनाचा फटका अवघ्या जगाला बसला आहे, तसाच त्रास निवासी डॉक्टरांनाही सोसावा लागत आहे. त्याचे स्वरूप मात्र काहीसे वेगळे आहे. निवासी डॉक्टर म्हणून काम करताना त्यांना हरतऱ्हेच्या रुग्णांचा अभ्यास करायला मिळतो; पण सध्या कोरोनाच्या काळात शासकीय रुग्णालयांत कोरोना रुग्णांचीच भरती सुरू झाल्याने इतर रुग्णांचा सराव करायचा कधी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
मिरज वैद्यकीय महाविद्यालयात एमडी करणाऱ्या आणि एमएस होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या निवासी डॉक्टरांना गेल्या वर्षभरापासून फक्त कोरोनाचेच रुग्ण तपासावे लागत आहेत. एमडीचा शिक्षणक्रम पूर्ण करताना वेगवेगळ्या आजारांचे जास्तीत-जास्त रुग्ण पाहण्याने ते अनुभव समृद्ध होतात; पण सध्या कोरोनाचेच रुग्ण पाहण्याने अनुभवांवर मर्यादा येत आहेत. मिरजेचे रुग्णालय पूर्णपणे कोविड घोषित करण्यात आले आहे. निवासी डॉक्टरांना काही दिवस मिरजेत आणि काही दिवस सांगलीत ड्युटी करावी लागते. सांगलीला अन्य रुग्ण पाहता येतात, पण जेमतेम तीन किंवा चार रुग्ण वाट्याला येतात, असा अनुभव निवासी डॉक्टरांनी सांगितला.
विविध आजार व विकारांच्या रुग्णांसाठी मिरज शासकीय रुग्णालय प्रसिद्ध आहे. पाच-सहा जिल्ह्यांतून तसेच कर्नाटकातूनही रुग्ण येत असल्याने तऱ्हेतऱ्हेचे रुग्ण डॉक्टरांना पाहायला मिळतात. पण सध्या फक्त कोरोना रुग्णांमुळे अन्य आजारांच्या अभ्यासावर मर्यादा येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही डॉक्टर्स अंतिम वर्षाला आहेत. बाहेर पडल्यानंतर विविध आजारांच्या रुग्णांसा कसे सामोरे जायचे, याची चिंता त्यांना लागून राहिली आहे. यासंदर्भात मार्डने संबंधित जिल्हाधिकारी, वैद्यकीय शिक्षण सचिव, आरोग्य मंत्र्यांपर्यंत धाव घेतली आहे. योग्य निर्णय झाला नाही, तर प्रसंगी राज्यस्तरीय सामूहिक आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोट
सध्या मिरज व सांगली रुग्णालयात रोटेशन पद्धतीने आम्हाला रुग्ण पाहता येतात; पण एका डॉक्टरला जेमतेम तीन-चारच रुग्णच मिळतात. यामुळे आमच्या अनुभवसंपन्नतेवर मर्यादा येत आहेत. फक्त कोरोनाचेच रुग्ण तपासत राहिलो, तर अन्य रुग्णांचा अनुभव मिळणारच नाही.
- डॉ. प्रसन्न नेने, निवासी डॉक्टर, मिरज-सांगली शासकीय रुग्णालय
कोट
मिरज रुग्णालय पूर्णपणेे कोविडसाठी राखीव ठेवू नये. काही विभाग कोरोनाग्रस्तांसाठी, तर उर्वरित अन्य आजारांच्या रुग्णांसाठी खुले ठेवावेत. यातून रुग्णांची गैरसोय दूर होईल, शिवाय आम्हालाही वेगवेगळ्या विकारांचे रुग्ण पाहता येतील.
- डॉ. अमित अंबाडे, निवासी डॉक्टर, मिरज-सांगली शासकीय रुग्णालय
गेले वर्षभर फक्त कोरोनाचेच रुग्ण तपासत आहोत. सांगलीत अन्य विकारांचे मोजकेच रुग्ण पाहायला मिळतात. गेले वर्षभर कोरोनाची साथ असतानाही शासनाने अन्य डॉक्टरांची व्यवस्था केली नाही. आम्ही ज्या विषयात स्पेशलायझेशन करत आहोत, त्याचे रुग्ण येत नाहीत. त्यामुळे अनुभव मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
- डॉ. प्रणाली पवार, निवासी डॉक्टर, मिरज-सांगली शासकीय रुग्णालय
कोट
मिरज शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साठ जागा रिक्त आहेत. त्या भरल्या, तर आमच्यावरील ताण हलका होईल. आम्हाला कोरोनाशिवाय अन्य रुग्णांकडे लक्ष देता येईल. कोरोनामुळे आमचे सलग दुसरे वर्ष वाया चालले आहे. भविष्यात दुर्दैवाने पुन्हा रुग्ण वाढले, तर त्यांच्यावरच उपचार करावे लागतील, पुरेशा अनुभवाविना आम्हाला बाहेेर पडावे लागेल. त्यामुळे रुग्णालयात कोरोना व अन्य रुग्णांसाठी वेगवेगळे विभाग करून आम्हाला रुग्ण उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
- डॉ. नागेश माने, अध्यक्ष, मार्ड, सांगली-मिरज
पॉईंटर्स
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर्स - २४०
कोविड वॉर्डात ड्युटी असलेले डॉक्टर्स - २४०
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी - १०००