चारुता सागर यांचे साहित्यात वेगळे स्थान
By Admin | Updated: November 24, 2014 23:04 IST2014-11-24T22:25:04+5:302014-11-24T23:04:29+5:30
विश्वासराव मोरे : मळणगावमध्ये एकदिवसीय साहित्य संमेलन

चारुता सागर यांचे साहित्यात वेगळे स्थान
शिरढोण : ‘नागीण’ कथासंग्रहातील नागीण, अंघोळ या मराठी साहित्यामधील अस्सल वाण कथा वाचत असताना, आजूबाजूला हुबेहूब घडत असल्याचा भास या कथांमध्ये दिसून येतो. उपेक्षितांचे जीवन उलगडून दाखविण्यात चारुता सागर यांचा हातखंडा असायचा. त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या कथांनी मराठी सारस्वतात स्वत:चं वेगळं स्थान पटकावलं आहे, असे मत जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वासराव मोरे यांनी व्यक्त केले.
मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील ज्येष्ठ कथाकार व लेखक चारुता सागर यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त एकदिवसीय साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक, चक्रव्यूह आकृती कादंबरीकार आप्पासाहेब पाटील होते. दत्ताजीराव शिंदे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
यावेळी प्राध्यापक अनिल पाटील यांनी ‘हराळी’ ही गवतावर आधारित कविता सादर केली, तर प्रा. विजय जाधव यांनी कथा सादर केली. चारुता सागर यांच्या कथेचे अभिवाचन दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले, तर संयोजन राजेंद्र भोसले, अनिल कुंभार, राजेंद्र साळुंखे यांनी केले.
या साहित्य संमेलनामध्ये ‘नागीण, मामाचा वाडा, नदीपार’ आदी कथासंग्रहांचे वाचन करण्यात आले. साहित्यरसिकांच्या मनात राज्य करणारे ज्येष्ठ कथाकार व कसदार लेखन करणारे चारुता सागर यांच्या कथा ऐकून उपस्थित भारावून गेले होते.
यावेळी सरपंच रमेश भोसले, अविराजे शिंदे, धनाजी पाटील, दिग्विजय शिंदे, भालचंद्र क्षीरसागर, माजी सरपंच जगन्नाथ चव्हाण, उध्दव पाटील, राजाराम पाटील, राजेंद्र भोसले, दत्ताजीराव शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन चारुता सागर साहित्य व सांस्कृतिक मंडळ, मळणगाव यांनी केले. (वार्ताहर)