समाजाची बदलती विचारसरणी आशादायक
By Admin | Updated: December 15, 2015 00:42 IST2015-12-14T23:52:33+5:302015-12-15T00:42:05+5:30
तारा भवाळकर : मराठा समाजतर्फे सर्वधर्मीय विधवा, विधूर, घटस्फोटितांचा मेळावा

समाजाची बदलती विचारसरणी आशादायक
सांगली : आजचा समाज हा केवळ राहणीमानाने नव्हे, तर विचाराने बदलत चालला असून, विधवा, विधूर व घटस्फोटितांच्या विवाहासाठी मराठा समाजने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असून, समाजातील बदलाच्या या पाऊलखुणा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर यांनी रविवारी केले. मराठा समाज सांगलीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय विधवा, विधूर, घटस्फोटित वधू-वर मेळाव्यात भवाळकर बोलत होत्या.
या म्हणाल्या, जातीपातीची बंधने तोडणे आता आवश्यक बनले असून, विचार आणि आचारातून क्रांती घडत असल्याने याचा समाजाला फायदा होत असतो. दोनशे वर्षापूर्वी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह करत परंपरागत रुढी-परंपरेला फाटा दिला होता. आयुष्यात अपघात होत असतात, त्यामुळे समाजाची भीती न बाळगता आणि लोक काय म्हणतील यात न अडकता निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्यात सर्व जाती-धर्मातील विधवा, विधूर आणि घटस्फोटितांनी आपल्या भावी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी अध्यक्ष प्रकाश चव्हाण, तानाजीराव मोरे, आर. एस. पाटील, अशोक सावंत, रघुनाथराव पाटील, डॉ. मोहन पाटील, शशिकांत जाधव, बाळासाहेब सावंत, सुधीर सावंत, आर. डी. पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)