चंद्रकांतदादांनी पक्षपदाची वाटली खिरापत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:21 IST2021-02-05T07:21:00+5:302021-02-05T07:21:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीअगोदर भाजपने आयारामांची गर्दी पाहून महाभरती केली. गतवेळी पदांच्या आश्वासनाचे गाजर दाखविण्यात आले. ...

चंद्रकांतदादांनी पक्षपदाची वाटली खिरापत
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीअगोदर भाजपने आयारामांची गर्दी पाहून महाभरती केली. गतवेळी पदांच्या आश्वासनाचे गाजर दाखविण्यात आले. परंतु, वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीपुढे टिकाव लागला नाही. आता पुन्हा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपुरात बैठक घेतली. यात कोणाला विधानपरिषद, तर कोणाला विधानसभा देण्याचे आश्वासन दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
विधानसभा निवडणुकीअगोदर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात पेरणी केली. भाजपचे ज्येष्ठ विक्रम पाटील यांना म्हाडाच्या सदस्यपदी घेण्यात आले, तर आष्टा येथील वैभव शिंदे यांना महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या सदस्यपदी घेण्याची घोषणा केली. परंतु, त्यांचे हे दिवास्वप्न ठरले. विधानसभा निवडणुकीअगोदर कॉँग्रेसमधील सत्यजित देशमुख यांना विधानपरिषदेचे आश्वासन देऊन त्यांना भाजपमध्ये घेण्यात आले. तेही शक्य झाले नाही. त्यानंतर राज्यात महाआघाडीची सत्ता आली. वाळवा-शिराळ्यात भाजपची वाताहात झाली. त्यामुळेच पेठनाक्यावरील महाडिक बंधूंना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. सम्राट महाडिक यांना प्रदेश कार्यकारिणी सदस्यपद देण्यात आले, तर त्यांचे बंधू राहुल महाडिक यांना भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्षपद देण्यात आले, तर या दोन दिवसांत कामेरीचे युवा नेते जयराज पाटील यांना भाजप युवा मोर्चाचे सचिवपद देण्यात आले. तत्पूर्वी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना पुन्हा भाजपचे जिल्हा उपाध्यक्षपद देण्यात आले. पूर्वी उपाध्यक्ष असलेले विजय कुंभार यांचीही फेरनिवड करण्यात आली.
वाळवा-शिराळ्यात माजी आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, निशिकांत पाटील, विक्रम पाटील हे एका छताखाली येण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपुरात रविवारी (दि. २४) बैठकही घेतली. यामध्ये या सर्वांना एकत्रित येण्याचा कानमंत्र दिल्याचे समजते, तर २०२२ मध्ये रयत शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना पुन्हा विधान परिषदेवर घेण्याचे पाटील यांनी आश्वासन दिल्याचे समजते. एकंदरीत या दोन्ही तालुक्यांत पक्ष पदाची खिरापत वाटली असून, आगामी काळात हे सर्व भाजपच्या झेंड्याखाली एकत्र येतील का? हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
फोटो : चंद्रकांत पाटील यांचा सिंगल फोटो