हातकणंगलेसाठी भाजपकडून जोरदार चाचपणी चंद्रकांत पाटील यांची रणनीती : खोत, साळुंखे पटलावर, महाडिक गटाशीही संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 21:36 IST2018-08-20T21:33:57+5:302018-08-20T21:36:25+5:30
लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मातब्बर नेत्यांशी संपर्क ठेवून आहेत. खा. शेट्टी यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्याचा

हातकणंगलेसाठी भाजपकडून जोरदार चाचपणी चंद्रकांत पाटील यांची रणनीती : खोत, साळुंखे पटलावर, महाडिक गटाशीही संपर्क
अशोक पाटील
इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मातब्बर नेत्यांशी संपर्क ठेवून आहेत. खा. शेट्टी यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्याचा डाव आखला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाटील यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी आ. भगवानराव साळुंखे, वारणा उद्योग समूहाचे प्रमुख, माजी मंत्री विनय कोरे, काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याशी संपर्क ठेवलाआहे.
मागील निवडणुकीत खा. राजू शेट्टी यांना काँग्रेसच्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी आव्हान दिले होते. त्यामुळे ते आता पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता नाही. त्यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी ताराराणी आघाडीत झेंडा रोवला आहे.त्यामुळे आगामी काळात आवाडे घराणे काय करेल याबद्दल शंका व्यक्त होत आहे. कृषी राज्यमंत्री खोत यांनी आता स्वत: शेट्टी यांना आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र खोत अद्याप अधिकृत भाजपवासी झालेले नाहीत. त्यामुळे महसूलमंत्री पाटील यांनी शिक्षक संघटनेतील माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्याशी चर्चा केली आहे.
साळुंखे यांनी हातकणंगले मतदार संघातील ७०० गावांत शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आपण कसे सक्षम आहोत, याची चाचपणी भाजपने करावी, असा सल्ला देऊन उमेदवारीबाबत घोडे रेटल्याचे समजते.कोल्हापुरातील महादेवराव महाडिक आणि पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक या दोघांची ताकद एकत्रित करून खा. शेट्टी यांच्या विरोधात महाडिक घराण्यातील सक्षम व्यक्तीला उमेदवारी दिली तर इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचा मार्ग सुकर होईल, असाही महसूलमंत्री पाटील यांचा अंदाज आहे. यासाठी ते खोत यांच्या माध्यमातून महाडिक गटाशी संपर्क ठेवून आहेत.
कल्लाप्पाण्णा आवाडे यांना प्रकृती साथ देत नसल्याने ते आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. आवाडे घराण्यात काँग्रेसबरोबर माझ्या रूपाने ताराराणी आघाडीने शिरकाव केला आहे. आगामी काळातील भूमिका त्या-त्या परिस्थितीवर अवलंबून राहील.
राहुल आवाडे, जि. प. सदस्य, ताराराणी आघाडी, कोल्हापूर.