चंद्रकांत गुडेवारांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:14+5:302021-08-14T04:32:14+5:30
सांगली : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी शासनाकडे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुडेवार ...

चंद्रकांत गुडेवारांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज
सांगली : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी शासनाकडे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
गुडेवार यांनी सांगली जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दि. १८ डिसेंबर २०१९ रोजी पदभार घेतला. पदोन्नतीने पुणे, मुंबई येथे विनंती बदली मिळावी, अशी मागणी वर्षभरापूर्वी केली होती. पण, भ्रष्टाचारमुक्त कारभार करणारा शिस्तप्रिय अधिकारी कोणालाच नको असल्याने विनंती बदली मागूनही झाली नाही. पात्र असतानाही पदोन्नती मिळाली नाही. जिल्हा परिषदेचा पदभार घेतल्यापासून त्यांनी भ्रष्टाचारमुक्त कारभार करून खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. अधिकाऱ्यांमधील ठेकेदारांना घरचा रस्ता दाखविला. मजूर सोसायट्यांची मक्तेदारी संपवून प्रामाणिक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या पाठीशी ते उभेही राहिले. सदस्यांना ठेकेदारी करता येणार नाही, अशी ठोस भूमिका घेणारे ते एकमेव अधिकारी आहेत. यातून त्यांना सदस्य, काही आमदारांच्या असंतोषास सामोरे जावे लागले. जिल्हा परिषद सभांमध्येही त्यांचा सदस्य, पदाधिकाऱ्यांशी टोकाचा संघर्ष झाला. धमक्याही आल्या, पण त्यांनी न जुमानता कारभार चालू ठेवला.
या संघर्षाला गुडेवार सध्या कंटाळले आहेत. पदोन्नतीस पात्र असतानाही वंचित राहावे लागले. विनंती बदलीमिळालेली नाही. त्यामुळे अजून अडीच वर्षाची सेवा शिल्लक असताना त्यांनी शासनाकडे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज सादर केला आहे. विभागीय आयुक्तांकडून तो अर्ज मंत्रालयात गेला आहे.
कोट
आतापर्यंत प्रामाणिक काम केले आहे. सेवानिवृत्तीसाठी अडीच वर्षे शिल्लक आहेत. कौटुंबिक व अन्य कामांसाठी वेळ देण्याची गरज आहे. घरगुती अडचणीमुळे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला आहे. शासनाकडून तो मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे.
- चंद्रकांत गुडेवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी