चंद्रकांतदादांनी दिला नवा ‘सहकार’मंत्र

By Admin | Updated: April 15, 2015 00:29 IST2015-04-15T00:29:30+5:302015-04-15T00:29:30+5:30

सहकारी संस्थांच्या निवडणुका : तत्त्वाच्या राजकारणावर तडजोडींचे वर्चस्व; नेत्यांसमोर सर्व पर्याय खुले

Chandrakant Das offered new 'co-operatives' | चंद्रकांतदादांनी दिला नवा ‘सहकार’मंत्र

चंद्रकांतदादांनी दिला नवा ‘सहकार’मंत्र

अविनाश कोळी, सांगली : काही दिवसांपूर्वी सहकारी संस्था स्वबळावर लढण्याचे स्पष्ट मत व्यक्त करणारे भाजप नेते, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी सहकाराचा नवा लवचिक मंत्र दिला आहे. स्वबळाची भाषा करतानाच शक्य त्याठिकाणी अन्य पक्षांशीही हातमिळवणी करण्याबाबतचे संकेत त्यांनी सोमवारी सांगलीत दिले. त्यामुळे तत्त्वाच्या राजकारणावर आता तडजोडीच्या राजकारणाने वर्चस्व मिळविल्याचे चित्र भाजपसहित बहुतांश पक्षांमध्ये दिसत आहे.
सहकारी संस्थांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना एकदा प्रवेश तरी करावा लागेल. सहकार काय असतो, त्याची कार्यपद्धती काय असते, या बाबी समजून घेणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे शक्य तिथे स्वबळावर व काही ठिकाणी अन्य पक्षीय पॅनेलशी हातमिळवणी करून सहकारी संस्थांमध्ये प्रवेश करावा लागेल, असे मत चंद्रकांतदादांनी सोमवारी सांगलीत व्यक्त केले. चंद्रकांतदादांचा हा मंत्र अनेकांना धक्का देणाराही ठरला आहे. त्यांच्याच सहकार विभागाने ज्या माजी संचालकांची चौकशी लावून त्यांना जेरीस आणले, त्याच लोकांशी पुन्हा भाजप नेत्यांना निवडणुकीबाबत चर्चा करावी लागणार आहे. त्यामुळे तत्त्वाचे की तडजोडीचे राजकारण करायचे, या प्रश्नालाही त्यांनी उत्तर देऊन टाकले आहे.
त्यांचा हा नवा सहकारमंत्र मात्र जिल्ह्यातील नेत्यांच्या कामी येणार आहे. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याचे राष्ट्रवादीचे आवाहन भाजपने सकारात्मक पद्धतीने घेतले होते. परंतु निवडणूक लढवायची की राजकीय तडजोड करायची, याबाबत संभ्रमावस्था दिसत होती. चंद्रकांतदादांनी या संभ्रमावस्थेला दूर करीत शक्य तिथे लढण्याचे व शक्य तिथे अन्य पक्षांशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप नेते निश्चिंत झाले आहेत.
सहकाराचा नवा मूलमंत्र घेऊन आता भाजप नेते सरसावले आहेत. त्यांनी लगेचच मिरजेत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली. मनाप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाहीत, तर स्वबळावरही आम्ही लढू, असा नारा त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना जिल्हा बॅँकेत राजकारण नको आहे. सर्वपक्षीय पॅनेलच्या माध्यमातून बिनविरोध निवडणूक करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सुरुवातीला कॉँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या आवाहनास प्रतिसाद दिला होता. आता दोन्ही पक्षातील नेते आक्रमक होऊन आपल्या मागण्या पुढे रेटत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला ही ऐक्य एक्स्प्रेस चालविणे तितके सोपे राहिलेले नाही.
राष्ट्रवादी लवचिक होणार का?
आजवर जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रवादीने कधी अन्य पक्षांना डोईजड होऊ दिले नाही. महत्त्वाच्या संस्थांमध्ये त्यांची ताकद अन्य पक्षांपेक्षा मोठी असल्याने ते नेहमीच अन्य पक्षांपेक्षा अधिक आग्रही राहात आले आहेत. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत आ. जयंत पाटील हे हुकमी एक्का म्हणून काम करणार आहेत. भाजपमधील काही नेते अजूनही जयंतरावांचा शब्द मोडत नाहीत. त्यामुळे हुकमी एक्का राष्ट्रवादीला तारणार, की सत्तेच्या जोरावर भाजप नेतेच राष्ट्रवादीला लवचिक बनविणार, हा चर्चेचा विषय आहे.


 

Web Title: Chandrakant Das offered new 'co-operatives'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.