चांदोलीला 'अमेझिंग चांदोली' म्हणून नव्या स्वरूपात जगासमोर आणणार - खासदार धैर्यशील माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 02:49 PM2022-01-22T14:49:43+5:302022-01-22T14:51:03+5:30

चांदोली परिसर विकसीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर करण्याचे दिले निर्देश

Chandoli will be introduced to the world in a new form as Amazing Chandoli says MP Dhairyashil Mane | चांदोलीला 'अमेझिंग चांदोली' म्हणून नव्या स्वरूपात जगासमोर आणणार - खासदार धैर्यशील माने

चांदोलीला 'अमेझिंग चांदोली' म्हणून नव्या स्वरूपात जगासमोर आणणार - खासदार धैर्यशील माने

Next

शिराळा : चांदोलीचा परिसर हे आपले सर्वात मोठे वैभव आहे. हे वैभव जगाच्यासमोर येणे ही काळाची गरज आहे. यापुढे चांदोलीला 'अमेझींग चांदोली' म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा मानस आहे. त्याकरिता चांदोलीच्या इतिहासात प्रथमच यू ट्यूब, फेसबुक पेज, रिल्स, जर्सी आदींच्या माध्यमातून चांदोली मधील विविधता आता टप्याटप्याने जगासमोर येईल. असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले.

वारणावती (ता. शिराळा ) येथे वन सभागृहात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, उपवनसंरक्षक उत्तम सावंत, विजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती. चांदोली परिसर विकसीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर करावा असे निर्देश देखील खासदार धैर्यशील माने यांनी दिले.

खासदार माने म्हणाले, परिसर पर्यटन क्षेत्र व व्याघ्र प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात मोठी संधी असलेले हे क्षेत्र आहे. हे क्षेत्र पर्यटकांसमोर येण्यासाठी त्याचा कालबध्द विकास होणे व  पर्यटन क्षेत्र लोकल ते ग्लोबल करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चांदोलीच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील १० वर्षातील गरजा लक्षात घेवून संबंधित यंत्रणांनी प्रस्ताव तयार करावेत असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी खासदार  माने यांच्या हस्ते अमेझींग चांदोली या जर्सी, फेसबुक पेज, लोगो व पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले. चांदोलीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी राजीव पाटील यांनी तयार केलेल्या सोशल मीडिया रिल्सचे फेसबुक पेज व युट्युब चॅनेल व ट्रेलर चे लॉचिंगही यावेळी झाले.

यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, सुखदेव पाटील, हणमंतराव पाटील, सरपंच वसंत पाटील, वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, राजीव पाटील, सुमित साळुंखे, सागर जाधव, अर्जुन बिराजदार सुयोग पाटील, विजयसिंह देसाई, निलेश आवटे, आकाश पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वन विभाग व वन्यजीव विभाग, बांधकाम विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग यांनी चांदोली पर्यटन विकासाबाबतचे थोडक्यात सादरीकरण केले.

Web Title: Chandoli will be introduced to the world in a new form as Amazing Chandoli says MP Dhairyashil Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली