वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण मंगळवारी शंभर टक्के भरले. धरणात ३४.४० टीएमसी पाणीसाठा झाला.
धुवाधार पावसाने जुलैमध्ये चार दिवसांत धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. त्यानंतर हळूहळू साठा वाढत राहिला. अखेर मंगळवारी धरण शंभर टक्के भरले. चांदोली धरण परिसरात जुलैमध्ये सात दिवसांत १२५२ मिलिमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. २३ जुलैला ५७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
पावसाने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. ओढ्या-नाल्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. सोनवडे, आरळा, मराठवाडी या गावांना पुराने वेढा घातला होता. ठिकठिकाणी घरांची पडझड झाली आहे. सध्या ५९७ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. पावसाची उघडीप आहे. या परिसरात जूनपासून आजअखेर एकूण २८७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.