चांदोली धरणातून विसर्ग वाढवला
By Admin | Updated: September 2, 2014 23:57 IST2014-09-02T23:57:28+5:302014-09-02T23:57:28+5:30
पावसाची संततधार कायम

चांदोली धरणातून विसर्ग वाढवला
वारणावती : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरणाचे चारही दरवाजे आज मंगळवारी पुन्हा ०.७५ मीटरने उचलण्यात आले आहेत. काल हे दरवाजे ०.५० मीटरने उचलले होते. सध्या येथून ११ हजार ९० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.
गेल्या चार दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. गेल्या २४ तासांत ५३ मि. मी., तर आजअखेर २ हजार ६२२ मि. मी. पावसाची येथे नोंद झाली आहे. तालुक्यात पावसाचा जोर नसला, तरी धरण पाणलोट क्षेत्रात संततधार कायम आहे. धरणातील विसर्गामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. धरणातून ११ हजार ९० व वीजनिर्मिती केंद्रातून १६०० असा एकूण १२ हजार ६९० क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात होत आहे. आरळा-शित्तूर पुलाला पाणी लागले आहे. धरण १०० टक्के भरले असल्याने पावसाचा जोर वाढेल तसा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्गही वाढविण्यात येत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
दरम्यान, संततधार पावसामुळे चांदोली परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे ठिकठिकाणी खड्ड्यात पाणी साचले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास वा वाढल्यास धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन धरण व्यवस्थापनाचे शाखा अभियंता प्रदीप कदम यांनी केले आहे.
गतवर्षीपेक्षा यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केली असली, तरी वारणा नदीला तीनवेळा पूर आला आहे. आज सकाळी ढगाळ वातावरण होते. दुपारी सूर्यदर्शन घडले. पावसाने उघडीप दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. (वार्ताहर)