चाणक्य नीतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा
By Admin | Updated: December 1, 2014 00:08 IST2014-11-30T22:35:20+5:302014-12-01T00:08:30+5:30
उमा वैद्य : गुरुवर्य के. जी. दीक्षित गौरव व्याख्यानमाला

चाणक्य नीतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा
सांगली : आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक असल्याने ते सक्षम निर्माण व्हावेत यासाठी शालेय अभ्यासक्रमात चाणक्य नीतीचा समावेश आवश्यक असल्याचे मत कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकच्या कुलगुरु डॉ. उमा वैद्य यांनी व्यक्त केले. सिटी हायस्कूलमध्ये आयोजित गुरुवर्य के. जी. दीक्षित गौरव व्याख्यानमालेत त्या ‘कौटिल्यीय शासन नीती’ या विषयावर बोलत होत्या.
डॉ. वैद्य म्हणाल्या, चाणक्याने सांगितलेल्या न्यायशास्त्रानुसार गुन्हेगारांना शिक्षा जाहीर झाली, तर त्याची लगेच अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. गुन्हेगारांना कोणतीही सवलत देण्यास त्याचा विरोध होता. त्याचप्रमाणे गुन्हेगाराचे वय पाहून शिक्षा देऊ नका, असेही त्याने निर्देश दिलेले आहेत. दुर्दैवाने सध्याचे गुन्हेगार तुरुंगात देखील मजेत असतात. महत्त्वाचे म्हणजे फाशीची शिक्षा झाल्यावर वेळकाढू प्रक्रियेमुळे संबंधिताला फाशी होईलच याची खात्री देता येत नाही.
राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा, या विचारानेच त्याकाळी राजाचे सल्लागार म्हणून अमात्य, मंत्री आणि पुरोहिताची चाणक्याने नेमणूक केलेली होती. राजाने शत्रुराष्ट्रांवर विजय मिळविलाच पाहिजे, त्याचबरोबरीने त्याने स्वत:च्या षड्रिपूंवर विजय मिळविणे अत्यावश्यक असल्याचा सल्ला त्याने ‘कौटिल्यीय अर्थशास्त्र’ ग्रंथातून दिलेला आहे. तसेच किल्ले बळकटीकरण, सैनिकांची काळजी, हेर खाते सक्षम करणे आदी विषयांवरही त्याने भर दिलेला असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.
सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर, शशिकांत देशपांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गुन्हेगारांना सवलत नको
चाणक्याच्या न्यायशास्त्रानुसार गुन्हेगारांना शिक्षा जाहीर झाली, तर त्याची लगेच अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. गुन्हेगारांना कोणतीही सवलत देण्यास त्याचा विरोध होता. त्याचप्रमाणे गुन्हेगाराचे वय पाहून शिक्षा देऊ नका, असेही त्याने निर्देश दिलेले आहेत.