कारभाऱ्यांपुढे आव्हान बेदाणा मार्केटचे
By Admin | Updated: September 2, 2015 23:39 IST2015-09-02T22:38:38+5:302015-09-02T23:39:36+5:30
तासगाव बाजार समिती : पारदर्शी कारभाराची अपेक्षा; आश्वासन पूर्ततेसाठी लागणार कस

कारभाऱ्यांपुढे आव्हान बेदाणा मार्केटचे
दत्ता पाटील- तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली. सभापतीपदी अनुभवी अविनाश पाटील यांची, तर उपसभापतीपदी सतीश झांबरे यांची एकमताने निवड झाली. मात्र नव्या कारभाऱ्यांना विस्तारित बेदाणा मार्केट उभे करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. निवडणुकीच्या काळात दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळींचा कस लागणार असून, पारदर्शी कारभाराचीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील तालुकास्तरावरील सर्वात मोठी उलाढाल असलेली बाजार समिती म्हणून ओळखली जाते. राज्यातील सर्वात मोठे बेदाणा मार्केट येथे असल्यामुळे वर्षाला सातशे कोटींहून अधिक उलाढाल होते. त्यामुळेच या बाजार समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी निवडणुकीच्या काळात भाजप आणि राष्ट्रवादीत घमासान झाले होते. अटीतटीने झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती वर्चस्व मिळवले. नव्या कारभाऱ्यांचीही एकमताने निवड केली. पहिल्याच टर्मसाठी अनुभवी अविनाश पाटील यांना बाजार समितीतील कामाचा अनुभव आहे, तर उपसभापती सतीश झांबरे यांनीही सहकारी संस्थांत चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने विस्तारित बेदाणा मार्केटच्या उभारणीचे काम सुरू आहे. ४५ एकरांवर विस्तारित बेदाणा मार्केट उभारण्यात येत आहे. बाजार समिती, व्यापारी आणि शासनाच्या निधीतून हे मार्केट उभारण्यात येणार आहे. मात्र प्रशासकांच्या काळात गाळे वाटप प्रक्रियेवर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी आक्षेप घेतल्याने प्रशासकांनी गाळे वाटपाची प्रक्रिया स्थगित ठेवली आहे. त्यामुळे विस्तारित मार्केटचे काम ठप्प आहे. हे मार्केट पूर्णत्वास नेण्याचे मोठे आव्हान आहे. या मार्केटला चालना मिळाली तर बाजार समिती आणि तालुक्याच्याही विकासाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठीही कस लागणार आहे.
व्यापाऱ्यांना विश्वासात घेण्याची गरज
आर. आर. पाटील यांनी बेदाणा व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन विस्तारित मार्केटची पायाभरणी केली होती. विस्तारित मार्केटच्या उभारणीसाठी लागणाऱ्या निधीपैकी बहुतांश निधी व्यापाऱ्यांना गाळेवाटप केलेल्या अनामत रकमेतूनच उभारण्यात येणार होता. मात्र आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर, प्रशासकांनी गाळेवाटप करूनदेखील बहुतांश व्यापाऱ्यांनी अनामत रक्कम भरली नव्हती. व्यापाऱ्यांनाही विश्वासात घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पारदर्शी कारभाराची अपेक्षा
बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांकडून सातत्याने होत होते. चारा छावणीत केलेल्या भ्रष्टाचाराबाबत खासदार संजयकाका पाटील यांनी आरोप केले होते, तर संचालक मंडळ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील मतभेदही अनेकदा चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे सध्याच्या संचालक मंडळाकडून पारदर्शी कारभाराची अपेक्षा आहे.